

मुंबई: आयपीएल २०२६ मध्ये पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (MI) अवस्था खूपच खराब झाली आहे. १० सामन्यांत केवळ ३ विजय मिळवून आधीच संघ अडचणीत असताना, आता नेतृत्वाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. नियमित कर्णधार हार्दिक पांड्या दुखापतीमुळे बाहेर असताना, प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादवदेखील वैयक्तिक कारणांमुळे आगामी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. या नाट्यमय घडामोडींमुळे आता संघाची धुरा पुन्हा एकदा अनुभवी रोहित शर्माकडे सोपवली जाणार का? याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
१० मे रोजी रायपूर येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध मुंबईचा अत्यंत महत्त्वाचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी बुधवारी जेव्हा मुंबईचा संघ विमानतळावर जमला, तेव्हा हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे दोन्ही दिग्गज खेळाडू तिथे दिसले नाहीत. हार्दिकच्या पाठीच्या दुखापतीमुळे (Back Spasms) तो गेल्या सामन्यातही खेळला नव्हता. तर सूर्या वैयक्तिक कारणांमुळे संघासोबत रायपूरला रवाना झाला नसल्याचे समजते. एकाच वेळी दोन मुख्य खेळाडू आणि कर्णधार उपलब्ध नसल्याने मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
हार्दिक आणि सूर्या खेळणार नसतील, तर मुंबई इंडियन्सला नवीन कर्णधार शोधावा लागेल. अशा वेळी ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माचे नाव सर्वात आघाडीवर आहे. रोहितकडे असलेला दांडगा अनुभव पाहता, 'करो या मरो'च्या स्थितीत व्यवस्थापन त्याच्यावर पुन्हा विश्वास टाकू शकते. मात्र, रोहितने यंदा केवळ खेळाडू म्हणून खेळण्याचा निर्णय घेतल्याने तो हे आव्हान स्वीकारणार का, हा मोठा प्रश्न आहे.
जर रोहित शर्माने नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला, तर मुंबईकडे जसप्रीत बुमराह हा एक सक्षम पर्याय आहे. बुमराहकडे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव असून तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याशिवाय, भविष्य डोळ्यासमोर ठेवून युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडेही कमान सोपवण्याचा विचार संघ व्यवस्थापन करू शकते. मात्र, आरसीबीसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध अनुभवाला प्राधान्य मिळण्याची शक्यता अधिक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.