Rohit Sharma Angry after Sarfaraz khan gets out while following a mix-up with Ravindra Jadeja:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला गुरुवारी (15 फेब्रुवारी) सुरूवात झाली. राजकोटमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात पदार्पण करणारा सर्फराज खान नाट्यमयरित्या धावबाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला राग अनावर झाला होता.
या सामन्यात रविंद्र जडेजाने शतकी खेळी केली. मात्र असे असले तरी त्याने जोरदार सेलिब्रेशन केले नाही, कारण त्याआधीच्याच चेंडूवर पदार्पणवीर सर्फराज खान धावबाद झाला.
झाले असे की डावाचे 82 वे षटक सुरू होते. तेव्हा जडेजा 99 धावांवर स्ट्राईकवर होता, तर सर्फराज नॉन-स्ट्राईकर होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर जडेजाने फटका मारला आणि लगेचच धाव घेण्यासाठी कॉल दिला.
परंतु, तो चेंडू मार्क वूडने लगेचच पकडल्याचे पाहताच त्याने सर्फराजला धावेसाठी नको म्हटले. पण, तोपर्यंत सर्फराज क्रिज सोडून पुढे पळत आला होता. तो परत क्रिजमध्ये जाण्यापूर्वी वूडने थेट स्टंपवर निशाणा साधला. त्यामुळे 66 चेंडूत 62 धावा करून सर्फराजला माघारी परतावे लागले.
यावेळी तो खूप निराश झाला होता. तसेच तो चांगला खेळत असताना आणि पहिल्या दिवसातील शेवटची काही षटके बाकी असताना तो अशाप्रकारे धावबाद झालेला पाहून ड्रेसिंग रुममध्ये असलेला भारताचा कर्णधार रोहित शर्मा भडकला होता. त्याने त्याच्या डोक्यावरची टोपीही काढून खाली फेकली.
दरम्यान, या चेंडूनंतर पुढच्याच चेंडूवर जडेजाने नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या कुलदीप यादवसह एकेरी धाव काढत त्याचे शतक पूर्ण केले. हे त्याचे चौथे कसोटी शतक ठरले. मात्र त्याने जोरदार सेलिब्रेशन केले नाही. पण नेहमीप्रमाणे बॅट फिरवत शतकाचा आनंद व्यक्त केला.
दरम्यान, पहिला दिवस संपला तेव्हा जडेजा 212 चेंडूत 110 धावांवर नाबाद राहिला, तर कुलदीप 1 धावेवर नाबाद राहिला. यादरम्यान, जडेजाने कसोटीत 3000 धावाही पूर्ण केल्या. त्यामुळे तो कसोटीत 3000 धावा आणि 250 विकेट्स घेणारा भारताचा आर अश्विन आणि कपिल देव यांच्यानंतरचा तिसराच अष्टपैलू खेळाडू ठरला.
भारताने या सामन्यात पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 86 षटकात 5 बाद 326 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी भारताकडून कर्णधार रोहित शर्माने देखील 131 धावांची शतकी खेळी केली. तसेच त्याने आणि जडेजाने चौथ्या विकेटसाठी 204 धावांची भागीदारी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.