

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत अखेर आपले मौन सोडले आहे. वयाची चाळीशी जवळ येत असतानाही रोहितने या आगामी जागतिक स्पर्धेत खेळण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली असून, त्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे.
केविन पीटरसनसोबतच्या एका खास संवादादरम्यान रोहितने स्पष्ट केले की, २०२७ चा विश्वचषक जिंकणे हे त्याचे सर्वात मोठे ध्येय आहे. रोहित म्हणाला, "मला माझ्या देशासाठी तो विश्वचषक जिंकायला नक्कीच आवडेल. मी ५० षटकांचा विश्वचषक पाहतच मोठा झालो आहे आणि ती ट्रॉफी उंचावणे हे माझे स्वप्न आहे." २०११ च्या विश्वचषक विजेत्या संघात निवड न झाल्याची सल रोहितच्या मनात आजही कायम आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फायनलमध्ये मिळालेल्या पराभवानंतर आता रोहित दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या स्पर्धेत नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे.
रोहितसाठी २०२५ हे वर्ष अतिशय फलदायी ठरले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपल्या बॅटने धमाका करत 'प्लेयर ऑफ द सीरीज'चा किताब पटकावला. एवढेच नाही तर, ३८ व्या वर्षीही त्याने आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान गाठून आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याने दोन अर्धशतके झळकावून आपला फॉर्म कायम राखला होता. जरी नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी त्याचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरणार आहे.
२०२७ चा विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. तोपर्यंत रोहित ४० वर्षांचा होईल, जे कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिकदृष्ट्या मोठे आव्हान असते. सध्या रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तो केवळ एकदिवसीय स्वरूपावर लक्ष केंद्रित करत आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर तो इंग्लंडच्या भारत दौऱ्यात पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसेल. भारतीय चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे की, त्यांचा लाडका 'हिटमॅन' अजूनही मैदानात विजयाचे षटकार ठोकण्यासाठी सज्ज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.