

Rising Asia Cup 2026 Schedule India vs Pakistan
क्रिकेट चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राइजिंग आशिया कप २०२६ च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली असून, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना २२ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आयोजित या स्पर्धेत दोन्ही संघांना एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे युवा भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंमधील चुरस पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. कतारची राजधानी दोहा येथे १९ ते २९ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
राइजिंग आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तानसह नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांचा समावेश एकाच गटात करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याचे दिलेल्या वेळापत्रकात नमूद आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यांना नेहमीच मोठी लोकप्रियता मिळते. मात्र, या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही देशांच्या युवा खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्याच्या दृष्टीने अशा स्पर्धा उदयोन्मुख खेळाडूंसाठी महत्त्वाच्या ठरतात.
या स्पर्धेचा पहिला सामना १९ नोव्हेंबर रोजी बांगलादेश आणि हाँगकाँग यांच्यात होईल. त्याच दिवशी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांचे संघही मैदानात उतरतील. भारतीय संघ २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्याने आपल्या अभियानाची सुरुवात करेल.
त्यानंतर २२ नोव्हेंबरला पाकिस्तानशी सामना होईल, तर २४ नोव्हेंबर रोजी भारतीय संघ यूएईविरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळेल. गटातील कामगिरीनंतर उपांत्य फेरीचे सामने २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी होतील. स्पर्धेचा अंतिम सामना २९ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर बहुतांश सामने होतील. काही सामने युनिव्हर्सिटी ऑफ दोहा फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (UDST) क्रिकेट मैदानावरही आयोजित केले जाणार आहेत.
राइजिंग एशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, १९ नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग यांच्यात सकाळी ११:३० वाजता पहिला सामना होईल, तर श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात दुपारी ३:३० वाजता दुसरा सामना रंगेल. २० नोव्हेंबरला पाकिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात सकाळी ११:३० वाजता, तर भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात दुपारी ३:३० वाजता सामना होईल. २१ नोव्हेंबरला श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग यांच्यात सकाळी ११:३० वाजता आणि बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात दुपारी ३:३० वाजता लढत होईल. २२ नोव्हेंबरला यूएई विरुद्ध नेपाळ यांच्यात सकाळी ११:३० वाजता सामना होणार असून, क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला त्याच दिवशी दुपारी ३:३० वाजता खेळवला जाईल.
२३ नोव्हेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात सकाळी ११:३० वाजता, तर श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुपारी ३:३० वाजता सामना होईल. २४ नोव्हेंबरला भारत विरुद्ध यूएई यांच्यात सकाळी ११:३० वाजता आणि पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात दुपारी ३:३० वाजता लढत होईल. त्यानंतर स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना २६ नोव्हेंबरला, दुसरा उपांत्य सामना २७ नोव्हेंबरला आणि अंतिम सामना २९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. हे तिन्ही सामने दुपारी ३:३० वाजता सुरू होतील.
राइजिंग आशिया कपच्या मागील आवृत्तीत भारतीय ए संघाने दमदार सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात भारताने यूएईचा १४८ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत चार बाद २९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूएईला सात बाद १४९ धावांपर्यंतच मजल मारता आली.
मात्र, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान ए संघाने भारताला आठ विकेट्सने पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १३६ धावांवर आटोपला. पाकिस्तानने १३.२ षटकांत लक्ष्य गाठले. त्यानंतर भारताने ओमानविरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेश ए संघाशी झाला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सहा विकेट्सच्या मोबदल्यात १९४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानेही निर्धारित २० षटकांत १९४ धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने बाजी मारल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मागील आवृत्तीत पाकिस्तान ए संघाने विजेतेपदावर नाव कोरले होते. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने श्रीलंका ए संघाचा पाच धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात पाकिस्तान ए आणि बांगलादेश ए या दोन्ही संघांनी प्रत्येकी १२५ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानने विजय मिळवत जेतेपद पटकावले.
आता २०२६ च्या स्पर्धेत भारतीय ए संघाला मागील कामगिरी सुधारण्याची संधी असेल. विशेषतः २२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांचे लक्ष लागले असेल. मात्र, अंतिम विजेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघाला गटातील सामने जिंकण्याबरोबरच उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यातही सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.