Rishabh Pant Opened up on his car accident moment:
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. त्याला 30 डिसेंबर 2022 रोजी पहाटे दिल्लीमधून रुडकीला येत असताना गंभीर कार अपघात झाला होता. त्यातून पंत सुदैवाने बचावला आणि आता तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर येण्यासाठी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, त्याने नुकतेच या घटनेबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे. त्याने सांगितले की त्यावेळी त्याला एकाक्षणी वाटलेले की तो यातून वाचणार नाही.
स्टार स्पोर्ट्सवरील बिलिव्ह या सिरिजमधील एका एपिसोडमध्ये पंतने त्याच्या अपघाताबद्दल भाष्य केले. या एपिसोडचा प्रोमो स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. त्यात त्याने त्याच्या अपघातावेळीच्या क्षणांबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
पंत म्हणाला, 'माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात त्यावेळी मला पहिल्यांदाच वाटते की या जगातील माझा वेळ संपला आहे. अपघातावेळी मला माझ्या जखमा जाणवत होत्या. पण मी सुदैवी होतो कारण दुखापत आणखी गंभीर होऊ शकली असती. मला वाटले की कोणीतरी मला वाचवले.'
'मी डॉक्टरांनाही विचारले की मला बरे होण्यासाठी कितीवेळ लागणार आहे, तेव्हा त्यांनी सांगितले होते की 16 ते 18 महिने लागू शकतात. मला माहित होते की मला या वेळेत पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.'
त्या अपघातावेळी पंतची गाडी पूर्ण जळाली होती. तसेच त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला, पाठीला आणि पायांना जखमा झाल्या होत्या. त्याचबरोबर त्याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. तसेच त्याच्या चेहऱ्यावरील जखमांसाठी प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली.
आता तो या दुखापतींमधून बाहेर येत असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून बंगळुरुमध्ये असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे.
दरम्यान, पंत आगामी आयपीएल 2024 स्पर्धेतून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याती शक्यता आहे. पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. जर पंतचे आयपीएलमध्ये यशस्वी पुनरागमन झाले, तर त्याचा जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी भारतीय संघातील निवडीसाठी विचार केला जाऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.