Hyderabad Crowd misbehave with LSG team: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना झाला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एक वादग्रस्त घटना घडली आहे. या सामन्यात मैदानातील प्रेक्षकांच्या कृत्यांमुळे काही क्षणांसाठी सामनाही थांबला होता.
झाले असे की या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून 19 व्या षटकात हेन्रिक क्लासेन आणि अब्दुल सामद फलंदाजी करत होते. तसेच लखनऊकडून आवेश खान गोलंदाजी करत होता. यावेळी त्याने तिसरा चेंडू सामदविरुद्ध फुलटॉस टाकला. तो चेंडू मैदानातील पंचांकडून तो चेंडू सामदच्या कमरेच्या वर असल्याचे सांगत नो-बॉल देण्यात आला.
पण लखनऊने यावर डिसिजन रिव्ह्यू सिस्टिमची (DRS) मागणी केली. त्यावर तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिल्यानंतर मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यास सांगितले. मात्र, तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर सामदचा फलंदाजी साथीदार क्लासेन खूश नव्हता. तो पंचांकडे याबद्दल तक्रार करत होता. तसेच त्यांच्याशी चर्चा करत होता.
याचवेळी प्रेक्षकांमध्येही गोंधळ झाला. त्याचवेळी लखनऊच्या डगआऊटमधील सदस्य मैदानात आले आणि त्यांनी काही प्रेक्षकांची तक्रार पंचाकडे केली. तसेच हे सदस्य प्रेक्षकांकडे हात दाखवूनही काही सांगताना दिसले. त्यामुळे काही वेळासाठी सामनाधिकाऱ्यांना सामना थांबवावा लागला. त्यानंतर पोलिसांना लाँग ऑनच्या पलिकडील क्षेत्रात बोलावून घेण्यात आले.
पण नक्की काय घडले याबद्दल ऑन-एयर स्पष्ट करण्यात आले नाही. पण समालोचन करणारे सायमन डूल म्हणाले की 'हे खूप निराशाजनक असून याबद्दल मी अधिक माहिती देणार नाही. पण त्यांनी जे केले आहे, ते खूपच वाईट आहे.'
दरम्यान, सोशल मीडियावर काही युजर्सने लावलेल्या अंदाजानुसार प्रेक्षकांकडून लखनऊच्या डगआऊटमध्ये नट, बोल्ट आणि इतर वस्तू फेकण्यात आले होते. तसेच प्रेक्षक तिसऱ्या पंचांनी डीआरएसवर दिलेल्या निर्णयावर प्रेक्षक खूश नव्हते. याशिवाय काही युजर्सच्या मते लखनऊचा मार्गदर्शक गौतम गंभीरकडे पाहून त्यावेळी 'कोहली, कोहली'चे नारे दिले जात होते.
आयपीएल 2023 मध्ये काही दिवसांपूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि गंभीर यांच्यात वाद झाले होते.
दरम्यान, क्लासेननेही प्रेक्षकांच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली. तो डाव संपल्यानंतर म्हणाला, 'प्रेक्षकांनी त्यांच्या वागण्यामुळे निराश केले. पंचांकडूनही योग्य निर्णय घेण्यात आला नाही, पण त्यातून पुढे जावे लागेल. त्यामुळे मी माझी लय पूर्ण गमावली.'
या सामन्यात हैदराबादकडून क्लासेनने सर्वाधिक 47 धावा केल्या. 29 चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. तो 19 व्या षटकाच्याच अखेरच्या चेंडूवर बाद झाला.
तसेच हैदराबादकडून अनमोलप्रीत सिंग आणि अब्दुल सामद यांनीही चांगल्या खेळी केल्या. अनमोलप्रीतने ३६ धावांची खेळी केली, तसेच अब्दुल सामदने नाबाद 37 धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.