

RCB Star Phil Salt Injury: आयपीएल 2026 चा हंगाम आता अत्यंत निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून प्रत्येक सामन्यासोबत गुणतालिकेतील समीकरणे बदलत आहेत. अशातच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी एक वाईट बातमी समोर आली. संघाचा धडाकेबाज सलामीवीर फिल सॉल्ट दुखापतीमुळे मायदेशी म्हणजेच इंग्लंडला परतला. गेल्या तीन सामन्यांपासून तो संघाबाहेर होता, मात्र आता त्याच्या इंग्लंडला जाण्याने आरसीबीच्या अडचणींत भर पडली.
18 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना फिल सॉल्टला दुखापत झाली होती. सहाव्या षटकात चौकार वाचवण्यासाठी डायव्ह मारताना त्याच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत साधी वाटत असली तरी, वैद्यकीय तपासणीनंतर ती गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, तो सलग तीन सामन्यांना मुकला. आता तो उपचारांसाठी यूकेला रवाना झाला.
फिल सॉल्टने या हंगामात सहा सामन्यांत 168.33 च्या स्फोटक स्ट्राइक रेटने 202 धावा केल्या होत्या. त्याच्या अनुपस्थितीत जॅकब बेथल विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करत आहे, परंतु बेथलला आतापर्यंत तीन सामन्यांत केवळ 39 धावाच करता आल्या आहेत. सलामीची ही जोडी अपयशी ठरत असल्याने आरसीबी व्यवस्थापनाची चिंता वाढली.
आरसीबीने (RCB) अद्याप फिल सॉल्टसाठी कोणत्याही पर्यायी खेळाडूची (Replacement) घोषणा केलेली नाही. जर आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आणि तोपर्यंत सॉल्ट पूर्णपणे तंदुरुस्त झाला, तर तो पुन्हा संघात सामील होऊ शकतो. आरसीबीचा पुढील सामना गुरुवारी लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध होणार आहे. सध्या आरसीबी गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये असून प्लेऑफसाठी आपली दावेदारी भक्कम करत आहे. मात्र, सॉल्टसारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूचे मायदेशी जाणे संघाच्या फलंदाजीच्या संतुलनावर परिणाम करु शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.