Mohammed Siraj apology to Mahipal Lomror: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सध्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. बेंगलोरकडून मोहम्मद सिराजही दमदार कामगिरी करत असून संघाच्या विजयामध्ये मोठे योगदानही देत आहे. पण रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यानंतर अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याला संघसहकारी महिपाल लोमरोरची माफी मागावी लागली.
बेंगलोरने रविवारी राजस्थानविरुद्ध 7 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात बेंगलोरने 189 धावांचे यशस्वीरित्या बचाव केला. या सामन्यात सिराजने राजस्थानचा अनुभवी सलामीवीर जोस बटलरला पहिल्याच षटकात शुन्यावर बाद करत बेंगलोरला चांगली सुरुवात मिळवून दिली होती.
पण, अखेरीपर्यंत सामना रोमांचक झाला होता. दरम्यान, राजस्थान 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करत असलेला महिपाल लोमरोर चेंडू त्याच्याजवळ आल्यानंतर तो फेकताना चूकला. त्यामुळे बेंगलोरने धावबादची सोपी संधी दवडली. त्यावेळी राजस्थानकडून ध्रुव जुरेल आणि आर अश्विन फलंदाजी करत होते. त्यांनी दोन धावा काढल्या.
सिराजने माफी मागितली असल्याचे बेंगलोरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. व्हिडिओमध्ये सिराज असे म्हणताना दिसतोय की 'मी खूप चिडलेलो. काय नाव आहे, हा महिपाल खरंच तुझी माफी मागतो. मी तुझी याआधीही दोनदा माफी मागितली आहे. मी मैदानाबाहेर राग कायम ठेवत नाही. सामन्यानंतर सर्व शांत असते.'
यानंतर सिराज 'बेबी काम डाऊन' हे गाणेही गुणगुणताना दिसला. तसेच नंतर महिपालनेही त्याला माफ केल्याचे सांगत त्याने म्हटले की, 'मोठमोठ्या सामन्यात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहातात.'
दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 189 धावा केल्या होत्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली, तसेच फाफ डू प्लेसिसने 62 धावांची खेळी केली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 6 बाद 182 धावाच करता आल्या. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने 52 धावांची खेळी केली, तर यशस्वी जयस्वालने धावा केल्या. तसेच ध्रुव जुरेलने 34 धावांची नाबाद खेळी केली. तसेच बेंगलोरकडून हर्षल पटेलने 3 विकेट्स घेतल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.