Rashid Khan: राशिद खाननं जिंकलं मनं, भूकंपग्रस्तांना देणार वर्ल्ड कपची संपूर्ण फी
Rashid Khan's World Cup 2023 Fees Donation: अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशीद खानने वर्ल्ड कपची आपली संपूर्ण फी भूकंपग्रस्तांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
7 ऑक्टोबर रोजी भूकंपामुळे अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. या भूकंपात शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या भूकंपामुळे हेरात, फराह आणि बादघिसमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राशीदने X अकाऊंट (ट्विटर) द्वारे माहिती दिली की, तो भूकंपग्रस्तांना संपूर्ण वर्ल्ड कप फी देणार आहे.
राशीदने X वर लिहिले की, “अफगाणिस्तानच्या (Afghanistan) पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरत, फराह आणि बादघिस) झालेल्या भूकंपाबद्दल कळल्यानंतर खूप दुःख झाले. मी 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेची संपूर्ण फी पीडित लोकांना मदत करण्यासाठी दान करत आहे.”
तो पुढे म्हणाला की, 'लवकरच पीडितांसाठी निधी उभारण्याची मोहीम सुरु करणार आहे.' या पोस्टच्या कमेंट्सद्वारे लोक राशिद खानचे खूप कौतुक करत आहेत.
दरम्यान, भूकंपामुळे (Earthquake) झालेल्या विध्वंसाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती आहे.
तसेच, 10,000 लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, देशातील काही गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी होती.
अफगाणिस्तानने विश्वचषकातील पहिला सामना गमावला आहे
अफगाणिस्तानचा संघ विश्वचषकातील पहिला सामना हरला आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध संघाचा 6 गडी राखून पराभव झाला होता. दोघांमधील सामना धरमशाला येथे झाला होता.
आता अफगाणिस्तानचा दुसरा सामना भारताविरुद्ध 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार असून, हा विश्वचषकातील 9वा सामना असेल. या स्पर्धेत टीम इंडियाने पहिला सामना जिंकला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.