New Zealand Cricketer Rachin Ravindra open up on his Indian Connection:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला गुरुवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध 9 विकेट्सने दणक्यात विजय मिळवला. न्यूझीलंडच्या या विजयात 23 वर्षीय रचिन रविंद्रची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.
भारतीय वंशाचा असलेला, पण न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या रचिन रविंद्रने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना 96 चेंडूत नाबाद 123 धावांची खेळी केली. त्याने ही खेळी करताना डेवॉन कॉनवेबरोबर (152) दुसऱ्या विकेटसाठी 273 धावांनी नाबाद भागीदारीही केली. तसेच त्याने गोलंदाजी करताना हॅरी ब्रुकची महत्त्वपूर्ण विकेटही घेतली.
त्यामुळे रचिनबद्दल गुरुवारी क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरला. त्यातच तो भारतीय वंशाचा असल्याने आणि भारतात त्याचा पहिला वर्ल्डकप सामना खेळताना त्याने शतक केल्याने त्याच्याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे त्याच्या नावाशीही सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा संबंध आहे. याबद्दल त्याने सामन्यानंतरही प्रतिक्रिया दिली आहे.
रचिनचे आई-बाबा भारतीय असून ते कामानिमित्त त्याच्या जन्मापूर्वीच न्यूझीलंडला स्थायिक झाले होते. असे असले तरी त्याचे आजी-आजोबा बंगळुरूमध्ये असतात. त्याचे वडील बंगळुरूचे आहेत.
याबद्दल बोलताना रचिन म्हणाला, 'मला वाटते शतक करणे नेहमीच खास असते, पण मला वाटते भारतात अशी कामगिरी करणे शानदार आहे. भारताशी नातं असल्याचा आनंद आहे. माझे आई-बाबाही इथे सामना पाहात होते, त्यामुळे मस्त वाटले, ते न्यूझीलंडमधून इकडे आले आहेत.'
'तो क्षण छान होता आणि नक्कीच भारतात आल्यावर नेहमीच मस्त वाटते. मी जेव्हाही बंगळुरूला असतो, तेव्हा मला कुटूंबिक जवळीक वाटते, मला माझ्या आजी-आजोबांना पाहाता येते, त्यामुळे या गोष्टी आनंद देतात.'
त्याचबरोबर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावरून त्याला नाव मिळाल्याबद्दल तो म्हणाला, 'द्रविड आणि तेंडुलकर, ते दोन्ही खूप खास क्रिकेटपटू आहेत. मी अनेक कहाण्या ऐकल्या आहेत आणि खूप फुटेजेसदेखील पाहिले आहेत. मला वाटते माझ्या आई-वडिलांचा आणि काही जून्या भारतीय क्रिकेटपटूंचा प्रभाव असणे छान आहे.'
रचिनचे आई-बाबा क्रिकेटचे चाहते आहेत, विशेषत: त्याचे वडील रविंद्र कृष्णामुर्ती हे सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे मोठे चाहते आहेत. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव रचिन ठेवले. रचिन नावातील 'र' हे अक्षर राहुल द्रविडच्या नावातील आहे आणि 'चिन' ही अक्षरे सचिनच्या नावातील आहे.
दरम्यान, रचिनही सचिन तेंडुलकरचा चाहता आहे. याबद्दल तो म्हणाला, 'नक्कीच मी सचिन तेंडुलकरला आदर्श मानतो. मला वाटते अनेक खेळाडूंसाठी तो आदर्श आहे. तो ज्याप्रकारे फलंदाजी करतो, त्याचे तंत्र, हे पाहायला मजा येते. मला वाटते मी डावखुरा असल्याने आणखी काही खेळाडू आहेत, जे मला आवडतात. मला लारा आवडतो, मला संगकारा आवडतो, पण तेंडुलकर नक्कीच आदर्श आहे.'
तथापि, गुरुवारी झालेल्या सामन्यात रचिन आणि कॉनवे यांच्या फटकेबाजीमुळे इंग्लडने दिलेले 283 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 36.2 षटकातच एक विकेट गमावत पूर्ण केले. त्यामुळे न्यूझीलंडने वर्ल्डकपमधील त्यांच्या मोहिमेची सुरूवात मोठ्या विजयाने केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.