R Ashwin Open up on his tweet after Team India WTC 2023 final loss against Australia: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाला 209 धावांनी पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली. दरम्यान, या सामन्यात भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये न खेळवण्याबद्दल कर्णधार रोहित शर्मा आणि संघव्यवस्थापनेला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले होते.
पण, अश्विनने पराभवानंतर लगेचच ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. या ट्वीटबद्दल अश्विनने खुलासा केला आहे.
अश्विनने ट्वीट केले होते की 'कसोटी चॅम्पियशीपचा अंतिम सामना जिंकल्याबद्दल आणि या कसोटी स्पर्धेच्या या पर्वाचा शेवट करण्याबद्दल अभिनंदन. पराभूत संघाच्या बाजूला असणे निराशाजनक असते. पण तरीही इथपर्यंत अव्वल येण्यासाठी गेल्या 2 वर्षात केलेला प्रयत्न शानदार होता.'
'सर्व गोंधळ आणि टीकेदरम्यान मला वाटते की या पर्वात खेळलेल्या माझ्या सर्व संघसहकाऱ्यांचे आणि सर्वात महत्त्वाचे सर्वात मोठा आधार ठरलेल्या प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक करणे गरजेचे आहे.'
दरम्यान, या ट्वीटबद्दल अश्विनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने सांगितले की हे ट्वीट झालेल्या गोष्टी तिथेच संपवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी होते. त्याचबरोबर त्याने त्याच्या कुटुंबावर येणाऱ्या ताणाबद्दलही भाष्य केले.
तो म्हणाला, 'ज्या क्षणी अंतिम सामना संपला, त्यावेळी मी ट्वीट केले कारण मला जाणवले की मला हे संपवण्याची गरज आहे. ज्यावेळी हे सर्व थांबेल, तेव्हाच मी पुढे जाऊ शकेल. त्यातच घुटमळण्यासाठी वेळ नव्हता. मी आता आयुष्य अधिक चांगल्याप्रकारे समजू लागलो आहे.'
'मी जेवढं जास्त याकडे पाहातो, हे माझ्या कुटुंबावर अधिक आघात करतं. माझ्या वडिलांना हृदयाच्या आजाराची आणि आरोग्याच्या अन्य समस्या आहेत. प्रत्येक सामन्यावेळी, प्रत्येक दिवशी, काहीही झाले तरी, ते मला फोन करतात. ते तणावात असतात.'
'माझ्यासाठी जाऊन खेळणे सोपे आहे कारण, ते अजूनही माझ्या नियंत्रणात आहे. माझ्या वडिलांसाठी हे सोपे नाही, त्यामुळे मला जो त्रास होतो, त्याच्या दुप्पट त्रास त्यांना होतो. त्यामुळे या दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास बाहेर सर्वजण असंबद्ध असतात.'
याशिवाय अश्विनने त्याला संघात स्थान न मिळण्याबद्दल सांगितले, 'मला माझ्या प्रवासाबद्दल कोणतीही सहानुभूती नको आहे. माझ्यासाठी हे खूप सोपे आहे की मागे जाऊन म्हणणे की ठीके हे माझ्यासाठी नव्हते, त्याच्यासाठी एखादी गोष्ट घडली. मी मला कोणतीच सहानुभूती देत नाही. त्याचमुळे मी ते ट्वीट केले, कारण मला ते थांबवायचे होते. मला लोक सहानुभूती देत होते, याचा मला तिरस्कार वाटला. त्यामुळे मी ते अजून सहन करू शकलो नाही.'
'हे सोशल मीडियाचे युग आहे. यामध्ये तुम्ही जेव्हा खेळत नाही, तेव्हा कधीकधी तुम्ही खेळला असता, त्यापेक्षाही मोठे होऊन जाता. लोक बोलतात, जर तो खेळला असता, तर आपण जिंकलो असतो.'
'मला खात्री नाही, की जरी मी खेळलो असतो, तरी आपण जिंकलो असतो. मी नक्कीच माझे सर्वोत्तम प्रयत्न केले असते आणि मला वाटते मी तिथे यशस्वी होण्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले असते. मलाही वाटते की मी जागा मिळवू शकलो असतो. हेच सर्व मी करू शकतो. पण ज्याक्षणी सर्व झाले, त्यानंतर मला पुढे जायचे होते आणि दिंडीगुल ड्रॅगनसाठी तमिळनाडू प्रिमियर लीगवर लक्ष केंद्रित करायचे होते.'
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आर अश्विन कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 पर्वात सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने या स्पर्धेत 61 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच आर अश्विन सध्या कसोटी क्रमावारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 92 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 474 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.