Ranji Cricket Goa vs Puducherry: पुदुचेरीला पहिल्या डावात १२४ धावांची आघाडी मिळाल्यानंतर गोव्याने दुसऱ्या डावात सावध फलंदाजी करणे आवश्यक होते, पण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी उपाहारानंतर तसे झाले नाही, लौकिकप्राप्त फलंदाजांनी आत्मघाती फटक्यांची कास धरली आणि गोव्याच्या पराभवाचे ते मुख्य कारण ठरले.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील क गट क्रिकेट सामन्यात गोव्याला पुदुचेरीकडून नऊ विकेटने हार पत्करावी लागली. ४४ धावांचे विजयी लक्ष्य गाठताना एक गडी गमावल्यामुळे पुदुचेरीस बोनस गुण मिळाला नाही. त्यांना सहा गुण मिळाले. गोव्याने मागील लढतीत केरळला पराभवाचा धक्का दिला होता, पण यावेळी त्यांनी साफ निराशा केली.
पहिल्या डावात २२३ व दुसऱ्या डावात १६७ धावा करणाऱ्या संघाला मोसमातील पहिला पराभव पत्करावा लागला. गोव्याच्या दुसऱ्या डावात स्नेहल कवठणकरने चिवट झुंज देताना सर्वाधिक ४९ धावा केल्या, मात्र अंकित शर्माच्या फिरक घेतलेल्या चेंडूवर तो चकला व स्लिपमध्ये पारस डोग्राकडे झेल दिला. त्यानंतर गोव्याची आघाडी जास्त वाढणार नाही हे स्पष्ट झाले.
शानदार अष्टपैलू कामगिरी
पुदुचेरीचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित शर्मा याने दुसऱ्या डावात गोव्याची फलंदाजी कापून काढताना ६१ धावांत ६ गडी बाद केले. पहिल्या डावात त्याने एक फलंदाज बाद केला होता, तसेच पहिल्या डावात ७८ धावाही केल्या. सामनाधिकारी अमित पाठक यांनी ३१ वर्षीय अष्टपैलूस सामनावीर पुरस्काराने गौरविले. पुदुचेरीने पहिल्या डावात कालच्या ६ बाद २९९ वरून आज सकाळी ३४७ धावांची मजल मारली.
शतकवीर के. बी. अरुण कार्तिक (१२२) याला लक्षय गर्गने पायचीत बाद केले. पहिल्या डावात ५ गडी बाद केलेला पुदुचेरीचा आणखी एक डावखुरा फिरकी गोलंदाज सागर उदेशी याने दुसऱ्या डावात ३ बळी घेतले. पुदुचेरीच्या फिरकी माऱ्यासमोर गोव्याचे फलंदाज साफ निष्प्रभ ठरले. मूळ मध्य प्रदेशचा, पण यंदा पुदुचेरीचा पाहुणा क्रिकेटपटू असलेल्या अंकितने ५९व्या प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात नवव्यांदा डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.
गोव्याने गमावल्या ३ धावांत ४ विकेट
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारास सात मिनिटे बाकी असताना सलामीस आलेल्या सुयश प्रभुदेसाईने अंकित शर्माच्या गोलंदाजीवर पारस डोग्राकडे झेल दिला. उपाहारानंतर मंथन खुटकरला सागर उदेशी याने पायचीत बाद केले. त्यावेळी गोव्याची ३ बाद ६० अशी स्थिती झाली. त्यानंतर स्नेहल कवठणकर व दर्शन मिसाळ सावधपणे खेळत असताना गोव्याचा संघ पुदुचेरीसमोर आव्हानात्मक लक्ष्य ठेवणार असेच वाटत होते. मात्र अचानक फलंदाजांची मानसिकता बदलली. विनाकारण मोठ्या फटक्यांचा मोह झाल्याने गोव्याने २९ चेंडूंत ३ धावांत ४ गडी गमावले व यजमान संघाचा दुसरा डाव ७ बाद ९६ असा गडगडला.
अंकितच्या गोलंदाजीवर दर्शन व सिद्धेश लाड यांना उंचावरून फटके मारणे महागात पडले. दोन्ही वेळेस अबिन मॅथ्यू याने अनुक्रमे लाँगऑन व लाँगऑफला काही अंतर धावत प्रेक्षणीय झेल पकडले. सिद्धेशला ‘चष्मा’ मिळाला, दोन्ही डावात तो शून्यावर बाद झाला. एकनाथ केरकरलाही भोपळा फोडता आला नाही, सलग दुसऱ्या डावात त्याला सागर उदेशीने बाद केले. उदेशीच्या चेंडूने यष्टीचा कधी वेध घेतला हे मोहित रेडकरला उगमलेच नाही.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव ः २२३ व दुसरा डाव ः ५८.३ षटकांत सर्वबाद १६७ (सुयश प्रभुदेसाई १५, ईशान गडेकर ९, मंथन खुटकर १२, स्नेहल कवठणकर ४९, दर्शन मिसाळ १२, सिद्धेश लाड ०, एकनाथ केरकर ०, मोहित रेडकर १, अर्जुन तेंडुलकर २०, लक्षय गर्ग नाबाद २३, ऋत्विक नाईक ३, अबिन मॅथ्यू १-१४, सागर उदेशी ३-६१, अंकित शर्मा ६-६१) पराभूत वि. पुदुचेरी, पहिला डाव (६ बाद २९९ वरून) ः १०७ षटकांत सर्वबाद ३४७ (के. बी. अरुण कार्तिक १२२, कृष्णा पांडे ३२, एस. अश्वत नाबाद १७, सागर उदेशी १, अबिन मॅथ्यू १०, लक्षय गर्ग २१-१-६१-३, अर्जुन तेंडुलकर १७-३-६२-१, दर्शन मिसाळ ४३-८-१११-५, ऋत्विक नाईक ५-१-२०-०, मोहित रेडकर १५-०-७०-०, सिद्धेश लाड ६-०-१८-१) व दुसरा डाव ः १९.१ षटकांत १ बाद ४६ (नेयान कांगायान नाबाद १७, पारस डोग्रा १८, कृष्णा पांडे नाबाद १०, अर्जुन तेंडुलकर ५-१-११-०, दर्शन मिसाळ ९-४-१०-१, मोहित रेडकर ५-१-२१-०, सुयश प्रभुदेसाई ०.१-०-४-०).
दृष्टिक्षेपात...
- रणजी करंडक स्पर्धेत यंदा सलग ४ पराभवानंतर पुदुचेरी विजयी
- ३ अनिर्णित व १ विजय या कामगिरीनंतर गोव्याचा पहिला पराभव
- गोव्याचे आता ५ लढतीनंतर ११ गुण, पुदुचेरीच्या खाती तेवढ्याच सामन्यानंतर ६ गुण
- पर्वरी मैदानावरील ३४ लढतीत गोव्याचे आता १० पराभव
- रणजी क्रिकेट स्पर्धेत गोव्याविरुद्धच्या २ लढतीत पुदुचेरी प्रथमच विजयी
- गोव्याचा पुढील सामना १७ जानेवारीपासून सेनादलाविरुद्ध दिल्लीत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.