

PSL Press Conference Controversy : पाकिस्तान सुपर लीग २०२६ (PSL) चा बिगुल वाजण्यापूर्वीच मैदानाबाहेर हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत कराची किंग्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरचा पारा चढला. त्याने केवळ शाहीन शाह आफ्रिदीच नव्हे, तर मोहम्मद रिझवान आणि स्वतःच्याच देशाच्या मार्नस लाबुशेनची देखील भर सभेत शाळा घेतली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून क्रिकेट वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.
नेमकं घडलं असं की, स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी सर्व सहा संघांच्या कर्णधारांना माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. डेव्हिड वॉर्नर एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना, त्याच्या शेजारी बसलेले शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद रिझवान, सौद शकील आणि मार्नस लाबुशेन आपापसात कुजबुज करत होते आणि हसत होते.
यामुळे वॉर्नरच्या एकाग्रतेत व्यत्यय आला. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे वॉर्नरचा संयम सुटला. त्याने उत्तर देणे मध्येच थांबवले आणि कडक शब्दात विचारले, "काय चाललंय मित्रांनो? माफ करा, पण इथे काही शालेय मुलं बसली आहेत का?" वॉर्नरच्या या अनपेक्षित टोमण्यामुळे काही काळ पत्रकार परिषदेत शांतता पसरली आणि इतर खेळाडूंचे चेहरे बघण्यासारखे झाले होते.
गेल्या हंगामातील वॉर्नरची दमदार कामगिरी
डेव्हिड वॉर्नरने २०२५ मध्ये पीएसएलमध्ये पदार्पण केले होते आणि आपल्या पहिल्याच हंगामात त्याने बॅटने आग ओकली होती. ११ सामन्यांत ३६८ धावा कुटणाऱ्या वॉर्नरच्या नेतृत्वाखाली कराची किंग्सने साखळी फेरीत तिसरे स्थान पटकावले होते. जरी एलिमिनेटरमध्ये लाहोर कलंदर्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी वॉर्नरच्या आक्रमकतेची भुरळ चाहत्यांना पडली होती. आता २०२६ च्या हंगामात तो पुन्हा एकदा कराची किंग्सला जेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे.
२६ मार्चपासून पाकिस्तान सुपर लीग २०२६ ला अधिकृतपणे सुरुवात होत आहे. हंगामातील पहिला सामना गतविजेत्या लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन यांच्यात रंगणार आहे. गडाफी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात शाहीन आफ्रिदी लाहोरचे नेतृत्व करेल, तर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन हैदराबाद किंग्समेनची धुरा सांभाळणार आहे. मैदानातील लढतीपूर्वीच वॉर्नरने दिलेल्या या 'डोस'मुळे खेळाडूंमधील तणाव आता मैदानात कसा दिसून येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.