India vs Austalia 3rd T20I, Prasidh Krishna Record:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात मंगळवारी (28 नोव्हेंबर) पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटीला पार पडला. बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 223 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा बचाव करण्यात भारताला अपयश आले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 21 धावांची गरज होती, या षटकात प्रसिध कृष्णाने भारताकडून गोलंदाजी केली. पण त्याने तब्बल 23 धावा या षटकात दिल्या.
त्याने या सामन्यात एकूण 4 षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता तब्बल 68 धावा दिल्या होत्या.
त्यामुळे प्रसिध कृष्णा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्या एकूण गोलंदाजांच्या यादीत तो काईल ऍबॉटसह संयुक्तरित्या पाचव्या क्रमांकावर आला आहे.
ऍबॉटनेही दक्षिण आफ्रिकेकडून वेस्ट इंडिजविरुद्ध 2015 साली जोहान्सबर्गला झालेल्या टी20 सामन्यात 68 धावा खर्च केल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा खर्च करणारे गोलंदाज
75 धावा - कसून रजिता (श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऍडलेड, 2019)
72 धावा - ख्रिस सोल (स्कॉटलंड विरुद्ध न्यूझीलंड,एडिंगबर्ग 2022)
70 धावा - तुनाहान तुरान (तुर्की विरुद्ध झेक प्रजासत्ताक, इल्फोव्ह काउंटी, 2019)
69 धावा - बॅरी मॅककार्थी (आयर्लंड विरुद्ध आफगाणिस्तान, ग्रेटर नोएडा, 2017)
68 धावा - काईल ऍबॉट (द. आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, जोहान्सबर्ग, 2015)
68 धावा - प्रसिध कृष्णा (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गुवाहाटी, 2023)
या सामन्यात भारताने दिलेले 223 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या शतकाच्या जोरावर अखेरच्या चेंडूवर सहज पूर्ण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या विजयासह 5 सामन्यांच्या टी२० मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मॅक्सवेलने 48 चेंडूत 8 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 104 धावा केल्या.
तत्पुर्वी, भारताकडून ऋतुराज गायकवाडनेही शतकी खेळी केली. त्याने 57 चेंडूत 123 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 7 षटकार मारले. त्यामुळे भारताने 20 षटकात 3 बाद 222 धावा उभारल्या होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.