PCB: पाकिस्तान क्रिकेट संघाला मंगळवारी इंग्लंड संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत मायदेशात व्हाईटवॉशचा सामना करावा लागला होता. त्यानंतर बुधवारी लगेचच पाकिस्तान क्रिकेटमधून अशी बातमी येत आहे की रमीझ राजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपदावरून पायउतार करण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी रमीझ राजा यांच्या जागेवर पुन्हा एकदा नजम सेठी यांची नियुक्ती करण्यासाठी मंजूरी दिली आहे. रमीझ राजा गेल्याच वर्षी म्हणजे 2021 मध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा होता. पण आता त्यांना हे पद गमवावे लागले आहे.
नजम सेठी यांनी यापूर्वीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांनी 2018 मध्ये अध्यक्षपद सोडले होते. त्याआधी त्यांनी 2013 आणि 2014 मध्येही अध्यक्षपद सांभाळले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रधानमंत्री कार्यालयातून आधिसूचना जारी केली जाईल.
रमीझ राजांनी दिलेली बीसीसीआयला धमकी
दरम्यान, रमीझ राजा त्यांच्या काही विधानांमुळे गेल्या काही दिवसांत बरेच चर्चेत होते. त्यांनी अनेक विवादात्मक विधाने केली होती. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुढीलवर्षी होणारा आशिया चषक तटस्थ ठिकाणी होईल असे म्हटले होते. त्यानंतर रमीझ राजा यांनी धमकीच्या स्वरुपातील भाष्य केले होते.
खरंतर 2023 ला होणाऱ्या आशिया चषकाचे आयोजक पाकिस्तान आहे. पण, जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर रमीझ राजा यांनी म्हटले होते की जर भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नसेल, तर पाकिस्तानही पुढालवर्षी वनडे वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात जाणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.