

Mohammad Hafeez vs Saqlain Mushtaq Video: पल्लेकेलेच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध झालेल्या चुरशीच्या लढतीत पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. या दारुण पराभवाने पाकिस्तानच्या 2026 टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या. हॅरी ब्रूकच्या झंझावाती शतकाने पाकिस्तानच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर केला.
सध्या सुपर-8 फेरीच्या गुणतालिकेत पाकिस्तानची स्थिती अत्यंत बिकट असून दोन सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात केवळ एक गुण आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसाने धुवून गेल्याने पाकिस्तानला नशिबाची साथ मिळाली नाही. यातच इंग्लंडविरुद्धच्या दोन गड्यांनी झालेल्या पराभवाने उपांत्य फेरीत पोहोचण्याचे गणित पूर्णपणे बिघडले.
आता उपांत्य फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी पाकिस्तानला केवळ श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवून चालणार नाही, तर इतर संघांच्या निकालांवर आणि धावगतीवर (नेट रन रेट) अवलंबून राहावे लागणार आहे. संघाची ही दयनीय अवस्था पाहून आता पाकिस्तानमधील क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी खेळाडूंच्या निवडीवर आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संघाच्या खराब कामगिरीचे पडसाद थेट टीव्हीवरील लाईव्ह प्रक्षेपणात पाहायला मिळाले. 'टॅपमॅड' (Tapmad) या पाकिस्तानी स्पोर्ट्स शोमध्ये चर्चा सुरु असताना पाकिस्तानचे दोन दिग्गज मोहम्मद हाफीज आणि सकलेन मुश्ताक यांच्यात मोहम्मद नवाजच्या भूमिकेवरुन जोरदार खडाजंगी झाली. या वादाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील निवडीपासून झाली.
त्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) शादाब खान आणि मोहम्मद नवाज या दोन फिरकीपटू ऑलराउंडर्सना संधी दिली होती. या जोडीने मिळून 57 धावा दिल्या आणि दोन बळी टिपले, मात्र हे दोन्ही बळी नवाजच्या नावावर होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दोन्ही खेळाडूंनी त्यांचे कोट्याचे पूर्ण षटक टाकले नाहीत, प्रत्येकाने केवळ तीन-तीन षटके टाकली. यावरुन संघ व्यवस्थापनाचा त्यांच्यावर मॅच-विनर म्हणून पूर्ण विश्वास आहे का, असा प्रश्न हाफीजने उपस्थित केला.
हाफीजने थेट सवाल केला की, मोहम्मद नवाज नेमका कोणत्या प्रकारचा ऑलराउंडर आहे? तो फलंदाजी करणारा गोलंदाज आहे की गोलंदाजी करणारा फलंदाज? यावर माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांनी नवाजची पाठराखण करत सांगितले की, तो दोन्ही भूमिकांमध्ये संतुलित आहे आणि त्याच्या क्षमतेवर अशा प्रकारे शंका घेणे चुकीचे आहे. मात्र, हाफीज एवढ्यावरच थांबला नाही.
त्याने पुन्हा विचारले की, "नवाजची पहिली जबाबदारी नेमकी काय आहे? त्याची प्रमुख भूमिका गोलंदाजी आहे का?" त्यावर सकलेन यांनी उत्तर दिले की, नवाज फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सारखाच प्रभावी आहे. हाफीजने या उत्तरावर खोचक टोला लगावला की, जर तो फलंदाजीत इतकाच चांगला असेल तर संघ त्याला पाचव्या क्रमांकावर का खेळवत नाही?
या प्रश्नावर सकलेन यांनी दावा केला की, जेव्हा ते स्वतः पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक होते, तेव्हा त्यांनी नवाजला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले होते आणि त्याच्यात तशी क्षमता आहे. सकलेन यांच्या या उत्तराने हाफीज काहीसा चिडला आणि त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला की, "मग याचा अर्थ असा की तो एक फलंदाज आहे जो थोडीफार गोलंदाजी करु शकतो? त्याची प्रायोरिटी काय आहे?"
यावर सकलेन यांनी ठामपणे सांगितले की, जर एखादा खेळाडू तुम्हाला बॅट आणि बॉल दोन्हीने सामने जिंकून देऊ शकत असेल, तर तो एक परिपूर्ण ऑलराउंडर असतो आणि त्याला वेगळ्या चौकटीत बसवण्याची गरज नाही. लाईव्ह शोमधील या तिखट संवादामुळे सोशल मीडियावर (Social Media) मोठी चर्चा सुरु झाली असून पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत गोंधळ आणि धोरणांचा अभाव या पराभवासाठी कारणीभूत असल्याची टीका आता चाहते करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.