पणजी: गोव्यातील युवा क्रिकेटपटूंच्या प्रशिक्षण व्यवस्थेतील कमतरता दूर करताना गोवा क्रिकेट असोसिएशनने (GCA राज्यातील आठ केंद्रांवर सर्व सुविधायुक्त पूर्णवर शिबिर सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी सांगे येथील केंद्र बुधवारपासून (ता. 6) कार्यरत होणार असल्याची माहिती जीसीए सचिव विपुल फडके (Vipul Fadke) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. (Organizing camps at eight centers to give priority to youth cricket training says vipul phadke)
365 दिवस क्रिकेट मार्गदर्शन हेच जीसीएचे ध्येय असल्याचे विपुल यांनी सांगितले. पुढील मोसमाच्या तयारीसाठी 16 वर्षांखालील वयोगटातील शिबिर प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक खेळाडूंकडून ऑनलाईन प्रवेशिका मागवून निवड केली जाईल व त्यांना शिबिरात सामावून घेण्यात येईल, असे विपुल यांनी नमूद केले. सांगे येथील शिबिरासाठी 35 शाळांनी सहभाग निश्चित केल्याची माहिती त्यांनी दिली.
कोविडमुळे (Covid-19) वयोगट क्रिकेटपटूंच्या तयारीकडे दुर्लक्ष झाले, त्याचा परिणाम कामगिरीवर होत आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी राज्यातील विविध केंद्रावर उपलब्ध सुविधांच्या आधारे शिबिरे घेण्याचे संघटनेने ठरविले आहे, असे विपुल म्हणाले. 14 व 16 वर्षांखालील वयोगटावर भर असेल, तसेच जास्त खेळपट्ट्या असलेल्या केंद्रावर वरील वयोगटातील क्रिकेटपटूंनाही सामावून घेतले जाईल, असे जीसीए सचिवांनी स्पष्ट केले.
लेव्हल-1, लेव्हल-2 प्रशिक्षक
जीसीएच्या एनसीए लेव्हल-1 आणि लेव्हल-2 प्रशिक्षकांना मार्गदर्शन शिबिर प्रक्रियेत सामावून घेतले जाईल. प्रत्येक केंद्रावर आवश्यकतेनुसार त्यांची नियुक्ती केली जाईल. जीसीएचे क्रिकेट संचालक प्रकाश मयेकर शिबिरातील कामगिरीचे अवलोकन करतील, असे विपुल यांनी सांगितले. रणजी संघ प्रशिक्षक भास्कर पिल्ले, 19 वर्षांखालील संघ प्रशिक्षक राजेश कामत यांचा करार मेअखेरीस संपणार आहे. शिबिरात त्यांच्या अनुभवाचाही लाभ घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
युवा क्रिकेटपटूंची प्रशिक्षण केंद्रे
सांगेसह पर्वरी, पणजी जिमखाना, मडगाव क्रिकेट क्लब, धारबांदोडा, साखळी, काणकोण, खांडोळा या केंद्रावर शिबिर सुरू केले जाईल. लवकरच मडगाव क्रिकेट क्लबशी सामंजस्य करार केला जाईल, तसेच बार्देश तालुक्यातही केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न असल्याचे विपुल यांनी सांगितले. सांगे येथील पहिल्या केंद्रावर परेश पडियार प्रशिक्षक असतील.
प्रीमियर लीग स्पर्धेत सहा संघ
राज्यातील प्रमुख क्रिकेटपटूंचा सहभाग असलेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा दोन मोसम कोविडमुळे होऊ शकली नाही. सहा संघांची ही स्पर्धा 20 एप्रिलपासून खेळविण्यात येईल. त्यासाठी 11 एप्रिलला खेळाडूंचा लिलाव होईल, अशी माहिती विपुल फडके यांनी दिली. धेंपो, चौगुले, करिमाबाद, साळगावकर, मडगाव क्रिकेट क्लब, जीनो क्लब हे प्रीमियर लीग स्पर्धेतील संघ आहेत. प्रत्येक संघात 16 खेळाडू असतील. याम्ये प्रत्येकी चार खेळाडू एलिट अ व एलिट ब गटातील, पाच खेळाडू वयोगटातील, तर तीन खेळाडू लिलाव यादीत नसलेले (अ विभागात उल्लेखनीय ठरलेले) असतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.