Rohit Sharma on Akash Madhwal: मुंबई इंडियन्सने बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी पराभूत केले. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियवर झालेल्या या सामन्यातील विजयामुळे मुंबई इंडियन्सने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान निश्चित केले आहे. मुंबईच्या या विजयात वेगवान गोलंदाज आकाश मधवालने महत्त्वाचा वाटा उचलला.
मुंबईकडून मधवालने 3.3 षटके गोलंदाजी करताना केवळ 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 16.3 षटकात सर्वबाद 101 धावाच करता आल्या.
दरम्यान मधवालने आत्तापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी केली आहे. त्याने या हंगामातून पदार्पण करताना 7 सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या कामगिरीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही कौतुक केले आहे.
एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवल्यानंतर मधवालचे कौतुक करताना रोहित म्हणाला, 'तो गेल्यावर्षी एक सपोर्ट गोलंदाजाच्या रुपात संघात होता. पण जेव्हा जोफ्रा आर्चर गेला, तेव्हाच मी विचार केलेला की आकाशकडे कौशल्य आहे आणि तो आमच्यासाठी ती भूमिका निभावू शकतो.'
'मागील अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या अनेक खेळाडूंनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. त्यांना संघात असताना स्पेशल वाटणे आणि ते संघाचा भाग आहेत, असे वाटणे महत्त्वाचे असते. मैदानात त्यांना चांगले कर्फर्टेबल करणे माझे काम आहे.'
'सर्व खेळाडूंना त्यांची काय भूमिका आहे, हे माहित आहे. त्यांना संघासाठी कामगिरी बजावायची असते आणि हेच तुम्हाला हवे असते. एक संघ म्हणून आम्ही क्षेत्ररक्षणाची मजा घेतली. मैदानात प्रत्येकाने योगदान दिल्याचे पाहून चांगले वाटले. चेन्नईमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल, हे माहित होते. वानखेडेवर तुम्हाला एक किंवा दोन चांगली कामगिरीही पुरेशी असते. पण चेन्नईत वेगळा खेळ खेळावा लागतो.'
दरम्यान, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. तसेच सूर्यकुमार यादवने 33 धावांची खेळी केली. त्याचबरोबर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 182 धावा उभारल्या. लखनऊकडून नवीन उल हकने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने 27 चेंडूत 40 धावांची खेळी केली. पण अन्य कोणाला खास काही करता आले नाही. मुंबईकडून आकाश मधवालव्यतिरिक्त ख्रिस जॉर्डन आणि पीयुष चावलाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.