U19 World Cup 2024, U19 New Zealand vs U19 Afghanistan Video:
दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत मंगळवारी (23 जानेवारी) न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात 19 वर्षांखालील संघात ईस्ट लंडनला सामना झाला. रोमांचक झालेला हा सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या 1 विकेटने जिंकला.
या विजयासह न्यूझीलंडने पुढच्या फेरीतील प्रवेश पक्का केला. या सामन्यात काही नाट्यमय घटनाही घडल्या.
या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडसमोर अवघे 92 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचीही दाणादाण उडाली. त्यातच 29 वे षटक चांगलेच नाट्यपूर्ण ठरले. या षटकात अफगाणिस्तानकडून नासिर खान मारुफखील गोलंदाजी करत होता. तसेच स्ट्राईकवर मॅट रोव फलंदाजी करत होता, तर नॉन-स्ट्रायकरला एवाल्ड श्रुडर होता.
यावेळी या षटकाचा पहिलाच चेंडू टाकण्यासाठी नासिर येत होता. पण त्याने गोलंदाजी करताना श्रुडरला क्रिज सोडताना पाहिले आणि त्याच्या मागील स्टंपवरील बेल्स उडवत त्याला धावबाद केले. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली, ज्यात श्रुडर क्रिजच्या बाहेर असल्याचे दिसले.
त्यामुळे नॉन-स्ट्रायकर धावबादच्या नियमानुसार त्याला धावबाद देण्यात आले. यामुळे बरीच चर्चा झाली कारण त्यावेळी न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या 2 धावांची गरज होती आणि अफगाणिस्तानला विजयासाठी 2 विकेट्सची गरज होती.
दरम्यान, श्रुडर (5) धावबाद झाल्याने अफगाणिस्तान विजयापासून फक्त 1 विकेट दूर होते. तर न्यूझीलंडला 2 धावांची गरज होती. मात्र रोवने (5) पुढच्या चेंडूवर शॉट खेळला आणि 11 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रायन त्सोर्गसबरोबर धावत 2 धावा पूर्ण केल्या. त्यामुळे न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला.
या सामन्यात न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने सर्वाधिक 26 धावा केल्या, तर लाचलन स्टॅकपोलने 12 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही. अफगाणिस्तानकडून एएम गझनफरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच खलील अहमद आणि अरब गुल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. नासीरने 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानकडून जमशीद झद्रानने सर्वाधिक 22 धावांची खेळी केली. तसेच अरब गुलने नाबाद 10 धावा केल्या. या दोघांशिवाय कोणालाही 10 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा डाव 21.3 षटकात 91 धावांवरच संपुष्टात आला.
न्यूझीलंडकडून गोलंदाजीत मॅट रोवने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच रायन त्सोर्गस आणि एवाल्ड श्रुडर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ऑस्कर जॅक्सनने 1 विकेट घेतली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.