पणजी ः गोवा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बीएआय) उपाध्यक्षपदी निवड झाली. राष्ट्रीय संघटनेचे आमसभा शुक्रवारी आसाममधील गुवाहाटी येथे झाली. त्यावेळी 2022 ते 2026 या कालावधीसाठी कार्यकारी मंडळ निवडण्यात आले.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांची सलग दुसऱ्यांदा भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 2017 साली त्यांनी राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद स्वीकारले होते. ते आशिया बॅडमिंटनचे उपाध्यक्ष, तर जागतिक बॅडमिंटन (Badminton) महासंघाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यही आहेत.
ज्युनियर राष्ट्रीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय मिश्रा यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या सचिवपदी निवड झाली, तर महाराष्ट्राचे अरूण लखानी खजिनदारपदी निवडून आले. राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक (Coach) पुल्लेला गोपीचंद यांचीही उपाध्यक्षपदी निवड झाली. नव्या कार्यकारी मंडळात अकरा उपाध्यक्ष, तर आठ संयुक्त सचिव आहेत.
भारतीय बॅडमिंटन संघटनेचे नवनियुक्त कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष : हिमंता बिस्वा सर्मा, उपाध्यक्ष : अब्दुल बारी सिद्दिकी, अजय कुमार, अंबुमणी रामदोस, नरहर ठाकूर, ओमा दत्त शर्मा, पुल्लेला गोपीचंद, रातू तेची, शेखरचंद्र बिश्वास, एस. मुरलीधरन, विराजसागर दास, वातीझुलू सुझुमेरेन जमीर, सचिव : संजय मिश्रा, खजिनदार : अरूण लखानी, संयुक्त सचिव : अनिल चौगुले, कोंडा प्रभाकर राव, के. के. शर्मा, मयूर पारीख, एन. श्यामकुमार सिंग, ओमर रशीद, पी. अनाकम्मा चौधरी, सुरिंदर महाजन, सदस्य : बी. एस. मनकोटी, बामांग तागो, एच. लाल्नुनसियामा, कृष्णानंद जैसवाल, निलीन कुमार, प्रदीप गंधे, पिनबियांग्लांग लालू, सुकांता दास, संजीब कुमार, व्ही. अरुणाचलम.
गोव्याचे (Goa) नरहर ठाकूर यांची भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या कार्यकारी मंडळात चौथ्यांदा निवड झाली आहे. यापूर्वी ते सदस्य होते, नंतर मागील सलग दोन टर्ममध्ये ते संयुक्त सचिवपदी होते. आता पहिल्यांदाच त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. 2012 साली लंडन ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारतीय बॅडमिंटन संघाच्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी पाहिली होती. याशिवाय ऑल इंग्लंड, जपान ओपन आदी प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांतही त्यांनी भारतीय संघाचे व्यवस्थापकपद भूषविले आहे. ते भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या विकास समितीचेही सदस्य आहेत. गोवा बॅडमिंटन संघटनेत त्यांनी विविध पदावर काम केले असून सध्या अध्यक्ष आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.