पणजी : सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना युवा आघाडीपटू विक्रम सिंग याने नोंदविलेल्या गोलमुळे गतविजेत्या मुंबई सिटीस आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत रविवारी विजयाचा जल्लोष करता आला. दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला त्यांनी 1-0 फरकाने हरवले आणि प्ले-ऑफ फेरी दावाही कायम राखला.
फातोर्डा (Fatorda) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना झाला. 20 वर्षीय विक्रमने मोसमातील वैयक्तिक तिसरा गोल नोंदविताना चेन्नईयीनचा (chennai) गोलरक्षक देबजित मजुमदार याला 85व्या मिनिटास गुंगारा दिला.
बदली खेळाडू ब्रॅडेन इनमॅनच्या क्रॉसपासवर मुंबई सिटीचा दिएगो मॉरिसियो चेंडू नियंत्रित करू शकला नाही, मात्र विक्रमने संधी साधली आणि गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. तब्बल सात सामने विजयाविना राहिल्यानंतर डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने सामन्यात विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. भरपाई वेळेत संधी वाया गेल्यामुळे नंतर चेन्नईयीनला बरोबरीचे समाधान लाभले नाही. यावेळी त्यांच्या लुकास गिकिएविच याने फटका गोलपट्टीवरून मारला.
एकंदरीत मुंबई सिटीचा हा 14 लढतीतील सहावा विजय ठरला. त्यांचे आता 22 गुण आहेत. जमशेदपूर एफसीचेही तेवढेच गुण आहे, मात्र +5 गोलफरकामुळे ते चौथ्या, तर मुंबई सिटीला +3 गोलफरकासह पाचव्या स्थानी राहावे लागले. मागील चार लढती अपराजित राहिलेल्या चेन्नईयीन एफसीला 15 लढतीत सहावा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 19 गुणांसह ते सातव्या स्थानी कायम राहिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.