बंगळूरची पिछाडीवरून विजयाला गवसणी

ब्राझीलियन स्ट्रायकरचा हा मोसमातील सातवा गोल ठरला
Bangalore ISL Football
Bangalore ISL FootballDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सामन्यातील एक मिनिट पूर्ण होण्यापूर्वीच जमशेदपूर एफसीने सनसनाटी आघाडी घेतली, पण नंतर उत्तरार्धात बंगळूर एफसीने जोरदार मुसंडी मारत 3-1 फरकाने झुंजार विजयास गवसणी घातली. त्यामुळे आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेत माजी विजेत्यांना तिसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधता आली.

बांबोळी (Bambolim) येथील ॲथलेटिक स्टेडियमवर शनिवारी जमशेदपूरसाठी पहिल्याच मिनिटास डॅनियल चिमा चुक्वू याने गोल केला. नंतर सुनील छेत्रीने 55व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर 62व्या मिनिटास क्लेटन सिल्वा याने बंगळूरला आघाडी मिळवून दिली. आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक 49 गोल केलेल्या बार्थोलोम्यू ओगबेचे याला छेत्रीने गाठले. नंतर क्लेटन सिल्वा याने 90+3व्या मिनिटास आणखी एक गोल करून बंगळूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्राझीलियन स्ट्रायकरचा हा मोसमातील सातवा गोल ठरला.

Bangalore ISL Football
आयएसएल स्पर्धेत स्वयंगोलमुळे एटीके मोहन बागानचे नुकसान

बंगळूरचा हा 15 सामन्यातील सहावा विजय असून ते 23 गुणांसह तिसऱ्या स्थानी आले आहेत. समान गुणांत केरळा ब्लास्टर्स संघ +8 गोलफरकामुळे दुसऱ्या स्थानी कायम राहिला. बंगळूरचा गोलफरक +7 आहे. ते आता सलग नऊ सामने अपराजित असून पाच विजय व चार बरोबरीची नोंद केली आहे. जमशेदपूरला तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. त्यामुळे 13 लढतीनंतर 22 गुण कायम राहिल्यामुळे ते चौथ्या स्थानी घसरले.

सेटपिसेसवर बंगळूरचे वर्चस्व

उत्तरार्धात सेटपिसेसवर वर्चस्व राखत बंगळूरने (Bangalore) सात मिनिटांत दोन गोल नोंदवून जमशेदपूरवर आघाडी प्राप्त केली. विश्रातीनंतरच्या दहाव्या मिनिटास सुनील छेत्रीने आयएसएल (ISL) स्पर्धेतील वैयक्तिक 49वा गोल नोंदवत बंगळूरला बरोबरी साधून दिली. यासह त्याने स्पॅनिश फेरान कोरोमिनासला मागे टाकले आणि सर्वाधिक गोल केलेल्या नायजेरियन बार्थोलोम्यू ओगबेचे याला गाठले. पराग श्रीनिवासच्या ताकदवान थ्रो-ईनवर चेंडू सुनील छेत्रीकडे गेला असता अनुभवी आघाडीपटूने अचूक नेम साधला.

Bangalore ISL Football
केरळा ब्लास्टर्सला गवसला विजयी सूर, आयएसएलमध्ये दुसऱ्यास्थानी

नंतर ब्राझीलियन क्लेटन सिल्वा याच्या गोलमुळे बंगळूरला आघाडी मिळाली. रोशन नाओरेम याच्या शानदार कॉर्नर फटक्यावर क्लेटनच्या वेगवान हेडिंगवर जमशेदपूरचा बचावपटू जितेंद्र प्रसाद, तसेच गोलरक्षक टी. पी. रेहेनेश यालाही चेंडू अडविता आला नाही. सामना संपण्यास दहा मिनिटे असताना बंगळूरच्या पराग श्रीनिवास याने ग्रेग स्टुअर्टचा फटका गोलरेषेवरून चेंडू परतावल्यामुळे जमशेदपूरला बरोबरी साधणे शक्य झाले नाही. सामन्याच्या भरपाई वेळेत थ्रो-ईनवर क्लेटन सिल्वा याने बंगळूरचा विजय निश्चित केला.

स्पर्धेतील दुसरा वेगवान गोल

त्यापूर्वी सामन्याच्या 46व्या सेकंदास नायजेरियन डॅनियल चिमा चुक्वू याने गोल नोंदविल्यामुळे जमशेदपूरला सामन्यास स्वप्नवत सुरवात करता आली. त्याचा हा स्पर्धेतील चौथा गोल ठरला. मोसमात दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोल करण्याचा मान चिक्वू याला मिळाला. गेल्या पाच जानेवारीस हैदराबादविरुद्ध एटीके मोहन बागानच्या डेव्हिड विल्यम्स याने 12व्या सेकंदात गोल केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com