Mohammed Shami Village Mini Stadium: एकदिवसीय विश्वचषक 2023च्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात ऐतिहासिक गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद शमीने करोडो चाहते बनवले आहेत. उत्तर प्रदेशातील अमरोहामधील छोट्याशा गावात जन्मलेल्या या तुफानी गोलंदाजाचे जगभरातून कौतुक होत आहे.
12 नोव्हेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील शमीच्या शानदार कामगिरीनंतर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता कलागुणांना वाव देण्यासाठी शमीच्या गावात एक मिनी स्टेडियम बांधले जाणार आहे. प्रशासन त्याचा प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवत आहे.
अमरोहाचे डीएम राजेश त्यागी म्हणाले- “मोहम्मद शमीच्या गावात सहसपूर अलीनगरमध्ये मिनी स्टेडियम आणि ओपन जिम बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याच्या गावात पर्याप्त जमीन आहे. 20 मिनी स्टेडियम बांधण्याच्या सूचना सरकारकडून (Government) आल्या आहेत. त्यात अमरोहा येथील स्टेडियमही प्रस्तावित आहे.''
दरम्यान, शुक्रवारी अधिकाऱ्यांनी शमीच्या गावाला भेट दिली. त्यांनी स्टेडियमसाठी जमीन पाहून अधिकाऱ्यांना निर्देश दिले. शमीचे कुटुंब अजूनही गावातच राहते. मोहम्मद शमी अनेकदा त्याच्या गावी जात असतो. विश्वचषकातील (World Cup) धमाकेदार कामगिरीनंतर शमीच्या गावातील लोक खूप खूश आहेत. स्टेडियम आणि ओपन जिमच्या बांधकामामुळे शमीसारख्या प्रतिभावंतांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.
दुसरीकडे, शमी 19 नोव्हेंबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक फायनल खेळताना दिसणार आहे. त्याच्याकडून चाहत्यांना पुन्हा एकदा विस्फोटक गोलंदाजीची अपेक्षा आहे. शमीने या विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्याने 6 सामन्यात 5.01 च्या इकॉनॉमीने 23 विकेट घेतल्या आहेत. त्याने दोनदा 5, एकदा 4 आणि एकदा 7 विकेट्स घेतल्या आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.