Mohammad Shami, Rishabh Pant may leave for London to consult expert for their injuries-Reports:
भारतीय क्रिकेट संघाला आगामी काळात काही महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. अशात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची प्रतिक्षा भारतीय संघव्यवस्थापनेला आहे. सध्या शमी घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
आता अशी बातमी समोर येत आहे की शमी लवकरच लंडनला त्याच्या दुखापतीबद्दल तज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी जाणार आहे.
शमी 2023 वर्ल्डकपनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नाही. या स्पर्धेत तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. मात्र त्यानंतर तो गेल्या अनेक दिवसांपासून घोट्याच्या दुखापतीचा सामना करत आहे.
दरम्यान, तो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या दुखापतीमुळे त्याचा आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
आता क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार शमी लवकरच लंडनला तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला जाणार आहे. त्याच्यासह बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील स्पोर्ट्स सायन्स विभाग सांभाळणारे नितीन पटेल देखील लंडनला जाणार आहेत. एनसीएमध्ये पटेल यांच्या मदतीने शमी त्याच्या घोट्याच्या दुखापतीतून सावरत आहे.
दरम्यान, क्रिकबझच्या रिपोर्टनुसार बीसीसीआय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही लवकरच लंडनला पाठवू शकतात. पंतचा 2022 च्या अखेरीस कार अपघात झाला होता. या अपघातात त्याला गंभीर दुखापती झाल्या होत्या. त्याच्या गुडघ्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली.
यानंतर त्याला या दुखापतींमुळे गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर रहावे लागले आहे. आता तो आयपीएल 2024 स्पर्धेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की काही दिवसांपूर्वीच भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवच्या मांडीवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तोही काही काळ क्रिकेटपासून दूर असेल. पण तो आयपीएलमधून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार जूनमध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपपूर्वी पूर्ण तंदुरुस्त व्हावा अशी आशा भारतीय संघव्यवस्थापनेला असेल.
भारताचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये नॉर्थम्पटनशायर संघाकडून वनडे चॅम्पियनशीप खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पण अद्याप तो या दुखापतीतून सावरलेला नाही.
तो सध्या चालू असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळेल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, अद्याप तो एनसीएमध्ये या दुखापतीतून सावरत आहे.त्यामुळे आता तो देखील आयपीएलमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.