Mohammad Shami all 45 Wickets in ICC ODI Cricket World Cup Video:
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील 33 वा सामना गुरुवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 302 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा भारताचा या स्पर्धेतील सलग 7वा विजय ठरला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतही प्रवेश केला.
भारताच्या या विजयात मोहम्मद शमीचे योगदान मौल्यवान ठरले. त्याने या सामन्यात 5 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या या 5 विकेट्समुळे तो भारताचा वनडे वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
त्याने आता वनडे वर्ल्डकपमध्ये 14 सामने खेळताना 12.91 च्या सरासरीने 45 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने 3 वेळा एकाच सामन्यात 5 विकेट्स घेण्याचा कारनामाही केला आहे. त्यामुळे आयसीसीने सोशल मीडियावर त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
आयसीसीने शमीच्या आत्तापर्यंत वनडे वर्ल्डकपमध्ये 14 सामन्यात मिळून घेतलेल्या सर्व 45 विकेट्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शमीने 2015, 2019 आणि 2023 अशा एकूण तीन वर्ल्डकपमध्ये मिळून घेतलेल्या सर्व 45 विकेट्स आहेत.
या व्हिडिओला आयसीसीने कॅप्शन दिले आहे की '45 विकेट्स. वनडे वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने घेतलेल्या प्रत्येक विकेट्सचा आनंद पुन्हा घ्या.'
शमीने भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जवागल श्रीनाथ आणि झहीर खान यांना मागे टाकत अव्वल क्रमांका मिळवला आहे. झहिर आणि श्रीनाथ यांनी प्रत्येकी 44 विकेट्स वनडे वर्ल्डकपमध्ये घेतल्या आहेत.
भारताकडून वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज -
45 विकेट्स - मोहम्मद शमी (14 सामने)
44 विकेट्स - झहिर खान (23 सामने)
44 विकेट्स - जवागल श्रीनाथ (34 सामने)
33 विकेट्स - जसप्रीत बुमराह (16 सामने)
31 विकेट्स - अनिल कुंबळे (18 सामने)
शमीने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये झालेला 2015 वर्ल्डकप, इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेला 2019 वर्ल्डकप आणि आता भारतात होत असलेला 2023 वर्ल्डकप खेळला आहे. त्याने 2015 वर्ल्डकपमध्ये 7 सामने खेळताना 17 विकेट्स घेतल्या होत्या.
तसेच त्याने 2019 वर्ल्डकपमध्ये 4 सामने खेळताना 14 विकेट्स घेतल्या होत्या. यात एका हॅट्रिकचाही समावेश आहे. तसेच आता 2023 मध्ये त्याने आत्तापर्यंत 3 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत.
शमीने आत्तापर्यंत वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या 14 पैकी 13 सामन्यात किमान एकतरी विकेट घेतली आहे. त्याला केवळ 2015 वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात विकेट घेता आली नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.