

Marcus Stoinis 5 Sixes In An Over MLC: अमेरिकेत सध्या 'मेजर लीग क्रिकेट' या टी-20 टूर्नामेंटचा थरार सुरु असून, हंगामातील 9व्या सामन्यात सिएटल ओर्कास संघाने वॉशिंग्टन फ्रीडमवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात सिएटल ओर्कासच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. वॉशिंग्टन फ्रीडमने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, फलंदाजीसाठी उतरलेल्या सिएटल ओर्कास संघाला चांगली सुरुवात मिळाली. सलामीवीर आणि यष्टिरक्षक फलंदाज टिम सीफर्टने 20 चेंडूत 37 धावा केल्या, तर मॅथ्यू ब्रिट्ज्केने 23 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. अव्वल फळीतील फलंदाज बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि मार्कस स्टॉइनिस यांनी डावाची सूत्रे हाती घेत मैदानावर धावांचा पाऊस पाडला.
शिमरॉन हेटमायरने अवघ्या 33 चेंडूत 2 चौकार आणि तब्बल 9 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 79 धावांची झंझावाती खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 239.39 चा होता. दुसऱ्या बाजूने मार्कस स्टॉइनिसने त्याला तोडीस तोड साथ दिली. स्टॉइनिसने अवघ्या 16 चेंडूत 42 धावा ठोकल्या, ज्यात 6 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, स्टॉइनिसने एकाच षटकात तब्बल 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. 262.50 च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या स्टॉइनिस आणि हेटमायर यांच्या या वादळी भागीदारीमुळे सिएटल ओर्कासने 20 षटकांत 6 बाद 227 धावांचा डोंगर उभा केला.
228 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमच्या फलंदाजांना सिएटलचा गोलंदाज जसदीप सिंह याच्या भेदक माऱ्यासमोर टिकता आले नाही. वॉशिंग्टनचा संघ पूर्ण 20 षटकेही फलंदाजी करु शकला नाही आणि अवघ्या 16.2 षटकांत 139 धावांवर ऑलआऊट झाला. सिएटल ओर्कासकडून जसदीप सिंहने घातक गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 24 धावा देऊन 5 बळी पटकावले. या कामगिरीसह जसदीप सिंह मेजर लीग क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात एका सामन्यात 5 बळी घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याला कॅमेरुन ग्रीनने 2 बळी घेत चांगली साथ दिली. या मोठ्या विजयानंतर सिएटल ओर्कासचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 2 विजय आणि 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.