37th National Games Goa 2023 Mashaal Launching: वेळोवेळी लांबणीवर पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी अखेर गोवा सज्ज होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आयोजनाच्या बाबतीत शुक्रवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले.
बोधचिन्ह, शुभंकर ‘मोगा’ यांच्या अनावरणानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते दोना पावला येथील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये स्पर्धेची मशाल प्रज्वलित करण्यात आली; तर प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचा स्वर असलेल्या स्पर्धा गीताचेही सादरीकरण झाले.
या कार्यक्रमात राज्यपाल पिल्लई म्हणाले, ‘‘गोव्याच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नाही. आपण सारे मिळून ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी ठरवूया. यशप्राप्तीत गोमंतकीयांची एकजूट महत्त्वपूर्ण ठरेल.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपलब्धतेनुसार स्पर्धेचे येत्या २५ अथवा २६ ऑक्टोबरला उद्घाटन होणार असून समारोप ९ नोव्हेंबरला होईल.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळात होत असलेली ३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यादगार ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
‘‘गोव्याला पुन्हा कधी स्पर्धेचे यजमानपद मिळेल हे सांगता येणार नाही; मात्र भविष्यात देशाचा शतकमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करताना आम्ही स्वातंत्र्याच्या अमृत काळात ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली होती, हे सांगण्याची संधी निश्चितच प्राप्त होईल. स्पर्धेच्या यजमानपदात प्रत्येकजण वाटेकरी असावा. स्पर्धेनिमित्त जागृती, ऊर्जा गोमंतकीयांत निर्माण करण्याच्या उद्देशाने स्पर्धा मशाल राज्यात प्रवास करेल.’’
टाळी एका हाताने वाजत नाही : गावडे
गोवा ऑलिंपिक संघटना आणि राज्यातील विविध क्रीडा संघटना यांनी निधी पुरवठ्यास विलंब झाल्याबद्दल कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले होते.
तो मुद्दा पकडत क्रीडामंत्री गोविंद गावडे कार्यक्रमाच्या सुरवातीस म्हणाले, ‘‘३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरल्यानुसारच होईल. तयारी योग्य दिशेने सुरू आहे. स्पर्धेचे यशस्वी आयोजन ही संपूर्ण गोमंतकीयांची जबाबदारी आहे. सगळ्यांच्या आधाराची गरज आहे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही.’’
कात्याच्या जखमेवर मलमपट्टी
गोव्याची आंतरराष्ट्रीय विंडसर्फर कात्या कुएल्हो हिने महिलांच्या आयक्यू-फॉईल प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती.
परंतु, आशियाई महिला आयक्यू-फॉईल क्रमवारीतील निकष पूर्ण करण्यात कात्या अपयशी ठरल्याचे निदर्शनास आल्यानंतर पात्र ठरूनही केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कात्याने नाव यादीतून गाळले.
त्यामुळे तिची सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची संधी हुकली. राज्य सरकारही याप्रकरणी काहीच करू शकले नाही. अखेरीस दुखावलेल्या कात्याच्या जखमेवर मलमपट्टी करण्याच्या हेतूने मशाल प्रज्वलन कार्यक्रमास राज्यपालांकडे मशाल सुपूर्द करण्याचा मान कात्या हिला बहाल करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.