समतोल आणि मिश्र शैलीत खेळण्याऱ्या एफसी गोवा संघाची बांधणी करून चांगल्या कामगिरीचे उद्दिष्ट नवे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बाळगले आहे. तीन वर्षांच्या कालावधीत हैदराबाद एफसीचे सफल मार्गदर्शक म्हणून लौकिक मिळविल्यानंतर आता 54 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने गोव्यातील संघाची जबाबदारी स्वीकारली.
मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादने २०२१-२२ मध्ये आयएसएल स्पर्धा जिंकली. त्यापूर्वीच्या मोसमात संघाला पाचवा क्रमांक मिळवून दिला, तर गतमोसमात हैदराबादचा संघ आयएसएल साखळी फेरीत दुसऱ्या स्थानी राहिला.
एफसी गोवाने अजून आयएसएल करंडक पटकावलेला नाही, दोन वेळा त्यांना उपविजेतेपद मिळाले. मार्केझ यांच्यासमोर आता एफसी गोवास आयएसएल विजेतेपद मिळवून देण्याचे नवे आव्हान आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ‘एफसी गोवा मीडिया’शी संवाद साधला.
‘‘गोवा हे भारतातील लहान राज्य असले, तरी फुटबॉलच्या दृष्टीने मोठे आहे. एफसी गोवाव्यतिरिक्त धेंपो, साळगावकर आदी प्रख्यात संघ येथील असून गोव्यातील फुटबॉलला प्रदीर्घ इतिहास आहे. येथे क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉल खूप महत्त्वपूर्ण आहे,’’ असे निरीक्षण मार्केझ यांनी व्यक्त केले.
चांगले फुटबॉल खेळण्याचे ध्येय
‘‘बार्सिलोना हे माझे मूळ शहर, तीच भावना माझी गोव्याबद्दल आहे. त्यामुळे आम्ही चांगले फुटबॉल खेळण्याचे ध्येय बाळगले आहे. केवळ जिंकून चालत नाही, तर तुम्ही कसे जिंकता हे महत्त्वाचे आहे. यापूर्वी एफसी गोवाविरुद्ध खेळलो, तेव्हा प्रत्येकवेळी ते खडतर प्रतिस्पर्धी असल्याची जाणीव झाली. आयएसएल स्पर्धेच्या पत्रकार परिषदेत स्पर्धेतील कोणता संघ आव्हानात्मक असल्याची विचारणा झाली, तेव्हा मी एफसी गोवाची निवड केली, कारण ते चेंडूवर वर्चस्व राखतात आणि त्यामुळे तुम्हाला कायस्वरुपी केंद्रित राहावे लागते,’’ असे मार्केझ यांनी सांगितले.
विविधांगी शैलीवर भर
मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीला परिपूर्ण संघ मानले गेले आणि तीन वर्षांच्या कालावधीत त्या संघाने जिंकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला. याचप्रकारे मार्केझ यांना एफसी गोवा संघ बांधणी करायची आहे. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘काही प्रशिक्षकांची खेळण्याची शैली ठरावीक असते, तर काही प्रशिक्षक खेळाडूंनुसार जुळवून घ्यावे लागते असे सांगतात. मला याबाबतीत मिश्रण भावते. हैदराबाद एफसीत असताना प्रत्येक मोसमासाठी आमची वेगळी शैली असायची, तरीही आम्ही चांगले फुटबॉल खेळतो असे प्रत्येकजण सांगायचा.’’ ते पुढे म्हणाले, की ‘‘विविधांगी शैलीतील फुटबॉल खेळण्यासाठी तुम्हाला समतोल संघाची गरज भासते. तसे आम्ही करू शकलो, तर मोसमपूर्व कालावधीत त्यावर मेहनत घेऊ शकू.’’
‘‘मी खूप आनंदी आहे, कारण भारतातील एका सर्वोत्तम संघाशी आम्ही करार केलाय. अर्थात, सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आगामी मोसम चांगला ठरेल याबाबत आम्हाला खूप आशा आहे.’’
मानोलो मार्केझ, एफसी गोवाचे प्रशिक्षक
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.