Ranji Cricket: गोव्याविरोधात कर्नाटकचा 603 धावांचा डोंगर, मनीष पांडेचा द्विशतकी धमाका

दुसरा दिवसअखेर गोव्याच्या 1 बाद 45 धावा
Ranji Cricket Karnataka vs Goa | Manish Pandey
Ranji Cricket Karnataka vs Goa | Manish PandeyDainik Gomantak
Published on
Updated on

Ranji Cricket Karnataka vs Goa: मध्यफळीतील मनीष पांडे याने बुधवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर धमाकेदार फलंदाजी करताना गोव्याच्या गोलंदाजीची चिरफाड केली. त्याने 14 चौकारांसह 11 षटकारांची आतषबाजी केली, काही फटक्यांवर चेंडू थेट मैदानाबाहेर गेला. वेगवान गोलंदाजांनाही त्याने पुढे येत दूरवर पिटाळले. कारकिर्दीतील शंभराव्या प्रथम श्रेणी सामन्यात नाबाद द्विशतक झळकावलेल्या 33 वर्षीय फलंदाजांच्या तडाख्यामुळे कर्नाटकने रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याविरुद्ध पहिला डाव 7 बाद 603 धावांवर घोषित केला.

गोव्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 45 धावा केल्या. अमोघ देसाईला रोनित मोरे याने त्रिफळाचीत बाद केले. दिवसअखेर सुमीरन आमोणकर 30, तर सुयश प्रभुदेसाई 6 धावांवर खेळत होता. फॉलोऑन टाळण्यासाठी गोव्याला 454 धावा करणे आवश्यक आहे.

झंझावाती फलंदाजी

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 एकदिवसीय व 39 टी-२० सामने खेळलेल्या मनीषने झटपट क्रिकेटला साजेशी फलंदाजी करताना 186 चेंडूंतच नाबाद 208 धावा केल्या. त्याने सात हजार धावांचा टप्पाही ओलांडला, त्याच्या आता एकूण 7154 प्रथम श्रेणी धावा झाल्या आहेत. गतवर्षीपर्यंत भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या मनीषने बुधवारी 22 वे प्रथम शतकही नोंदविले. एकंदरीत त्याचे हे पाचवे द्विशतक ठरले. मागील दोन सामन्यात विशेष प्रभावी न ठरलेल्या मनीष दिवसभरात 200 धावा केल्या. मंगळवारी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर तो आठ धावांवर नाबाद होता. त्याने सातव्या विकेटसाठी शुभांग हेगडे याच्यासमवेत 123 चेंडूंत 123 धावांची भागीदारी केली. गोव्याचा मध्यमगती गोलंदाज फेलिक्स आलेमाव याला त्याने तब्बल सहा षटकार मारले. शतक 120 धावांत पूर्ण केल्यानंतर मनीषला फेलिक्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर डीप फाईन लेगला बदली क्षेत्ररक्षक दीपराज गावकर याने जीवदान दिले. त्यानंतर या शैलीदार फलंदाजीने दुसरे शतक अवघ्या 63 धावांत पूर्ण केले.

विशालचे शतक हुकले

कारकिर्दीतील तिसराच रणजी सामना खेळणारा 19 वर्षीय विशाल ओनात याचे पहिलेच शतक नऊ धावांनी हुकले. डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये अमोघ देसाईने त्याचा झेल पकडला. विशालने 211 चेंडूंत 11 चौकारांच्या मदतीने 91 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक, पहिला डाव (3 बाद 294 वरुन) : 148.2 षटकांत 7 बाद 603 घोषित (विशाल ओनात 91, मनीष पांडे नाबाद 208, बी. आर. शरथ 29, के. गौतम 16, शुभांग हेगडे नाबाद 39, लक्षय गर्ग 27-3-98-1, अर्जुन तेंडुलकर 26.2-4-79-2, फेलिक्स आलेमाव 24-0-157-0, दर्शन मिसाळ 47-5-145-3, मोहित रेडकर १४-०-५५-०, सिद्धेश लाड ७-०-३८-१, सुयश प्रभुदेसाई 3-0-16-0).

गोवा, पहिला डाव ः 23 षटकांत 1 बाद 45 (सुमीरन आमोणकर 30, अमोघ देसाई 5, सुयश प्रभुदेसाई नाबाद 6, रोनित मोरे 1-10).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com