FIDE Chess World Cup 2023 Final, R Praggnanandhaa VS Magnus Carlsen:
फिडे चेस वर्ल्डकपचा अंतिम सामना भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद आणि नॉर्वेच्या दिग्गज मॅग्नस कार्लसन यांच्यात झाला. या अंतिम सामन्यात टायब्रेकरमध्ये कार्लसनने प्रज्ञानानंदावर मात करत विजेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे प्रज्ञानानंदाचे स्वप्न भंगले आहे.
दरम्यान, 32 वर्षीय कार्लसनने पहिल्यांदाच वर्ल्डकप विजेतेपद जिंकले आहे. त्याने अंतिम सामन्यात 1.5-05 ने प्रज्ञानानंदावर मात केली. असे असले तरी प्रज्ञानानंदानेही अखेरपर्यंत चांगली झुंज दिली होती. मात्र, त्याेच वेळेचे गणित चूकत गेले आणि कार्लसन विजयी झाला.
या सामन्यातील पहिले दोन गेम ड्रॉ राहिले होते. अंतिम सामन्यात मंगळवारी पहिला गेम 35 चालींनंतर ड्रॉ झाला होता. तसेच बुधवारी दुसरा गेम 30 चालींनंतर ड्रॉ करण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी सहमती दर्शवली होती.
त्यामुळे गुरुवारी (24 ऑगस्ट) टायब्रेकर खेळवण्यात आला होता. टायब्रेकरमध्ये पहिल्या फेरीतच कार्लसनने त्याचे विश्वविजेतेपद निश्चित केले.
टायब्रेकरमधील पहिल्या गेममध्ये प्रज्ञानानंदाने चांगली सुरुवात केली होती. पण कार्लसननेही अनुभवाच्या जोरावर हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये कार्लसनने त्याची लय कायम ठेवली. पण प्रज्ञानानंदानेही चांगली लढत दिली. मात्र, दुसरा गेम ड्रॉ राहिला. त्यामुळे कार्लसनने आपला विजय निश्चित केला.
प्रज्ञानानंदाने सोमवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, जर प्रज्ञानानंदाने अंतिम सामना जिंकला असता, तर तो 21 वर्षांनंतर फिडे वर्ल्डकप जिंकणारा भारतीय ठरला असता. भारताने 2002 मध्ये चेस वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता.
या वर्ल्डकपमध्ये फॅबियानो कारुआनाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात निजत ऍबासोवला टायब्रेकरमध्ये पराभूत करत तिसरा क्रमांक मिळवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.