FIDE Chess World Cup Final: प्रज्ञानानंद वि. कार्लसन यांच्यातील दुसरा गेम ड्रॉ! आता ट्रायब्रेकर ठरवणार वर्ल्ड चॅम्पियन

R Praggnanandhaa and Magnus Carlsen: आर प्रज्ञानानंद आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात होत असलेल्या फिडे चेस वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील दुसरा गेमही ड्रॉ राहिला असून आता गुरुवारी टायब्रेकर खेळला जाईल.
Magnus Carlsen vs R Praggnanandhaa
Magnus Carlsen vs R Praggnanandhaa Dainik Gomantak
Published on
Updated on

FIDE Chess World Cup 2023 Final, R Praggnanandhaa VS Magnus Carlsen:

फिडे चेस वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंद नॉर्वेच्या दिग्गज मॅग्नस कार्लसनविरुद्ध खेळत आहे. या अंतिम सामन्यातील दुसरा गेमही बुधवारी (23 ऑगस्ट) ड्रॉ राहिला आहे.

बुधवारी प्रज्ञानानंद आणि कार्लसन या दोन्ही खेळाडूंनी 30 चालींनंतर ड्रॉ करण्यासाठी सहमती दाखवली. बुधवारी अंतिम सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यांसह कार्लसनने प्रज्ञानानंदविरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते. पण प्रज्ञानानंदलाही काळ्या मोहऱ्यांसह चांगला खेळ केला.

अंतिम सामन्यात मंगळवारी पहिल्या गेमही 35 चालींनंतर ड्रॉ झाला होता. त्यामुळे आता पहिले दोन गेम ड्रॉ झाल्यानंतर गुरुवारी विजेत्या खेळाडूचा निर्णय ट्रायब्रेकरमध्ये होईल. जर हा टायब्रेकर प्रज्ञानानंदाने जिंकला, तर तो इतिहास रचणार आहे.

Magnus Carlsen vs R Praggnanandhaa
R Praggnanandhaa: कार्लसनविरुद्ध चेस वर्ल्डकप फायनल खेळणारा कोण आहे आर. प्रज्ञान्नंद?

प्रज्ञानानंदला 21 वर्षांनंतर फिडे वर्ल्डकप जिंकणारा भारतीय बनण्याची संधी आहे. भारताने 2002 मध्ये चेस वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी विश्वनाथन आनंदने हा पराक्रम केला होता. आता प्रज्ञानानंदाला याच पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची चांगली संधी आहे.

सध्या सुरु असलेल्य वर्ल्डकपदरम्यान प्रज्ञानानंदने त्याचा 18 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याने सोमवारी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे 5 वेळच्या विश्वविजेत्या कार्लसनविरुद्ध तो अंतिम सामना खेळत आहे.

अंतिम सामन्यादरम्यान कार्लसनची तब्येत बरी नसल्याचे समजले आहे. तो बुधवारच्या खेळानंतर म्हणाला, 'प्रज्ञानानंदने चांगल्या खेळाडूंविरुद्ध खूप टायब्रेकर खेळले आहेत. मला माहित आहे तो चांगला खेळाडू आहे. जर माझ्यात उर्जा असती आणि माझा चांगला दिवस असता, तर नक्कीच मला चांगली संधी होती.'

त्याचबरोबर कार्लसनने फिडेचे आणि डॉक्टर व नर्सेसचे आभारही मानले आहेत. तसेच त्याने आशा व्यक्त केली की आणखी एक दिवस आराम करून त्याच्याच गुरुवारी अधिक ताकद असेल.

Magnus Carlsen vs R Praggnanandhaa
Chess World Cup 2023: प्रज्ञानानंदने गाठली अंतिम फेरी, आता जगातील अव्वल खेळाडूशी होणार मुकाबला!

त्याचबरोबर प्रज्ञानानंद म्हणाला, 'मला वाटलं नव्हतं की तो आज लवकर ड्रॉ करेल,पण जेव्हा तो यासाठी गेला तेव्हा मला लक्षात आलं की त्याला ड्रॉ करायचा आहे. मलाही ते ठिक वाटलं. मलाही थकल्यासारखे वाटत आहे. आता मी उद्या सर्वोत्तम देऊ शकेन आणि त्यानंतर आराम करेन.'

याशिवाय प्रज्ञानानंदाने आशा व्यक्त केली की कार्लसन उद्या बरा होईल. तसेच तो म्हणाला, 'उद्या मी ताजेतवाने होऊन येईल. मी आज आराम करण्याचा प्रयत्न करेल. हे खूप महत्त्वाचे आहे कारण मी येथे खूप ट्रायब्रेकर खेळलो आहे. मला सर्व गोष्टींसाठी तयार राहावे लागेल.'

प्रज्ञानानंदाने लहानपणापासूनच भारतातील प्रतिभाशाली बुद्धिबळपटू म्हणून ओळखला जात होता. आता गुरुवारी तो इतिहास घडवणार की कार्लसनचा अनुभव भारी पडणार, याकडे अनेक चेस चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com