Lionel Messi: अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला मैदानात खेळताना पाहण्यास चाहते उत्सुक असतात. आता त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे, की मेस्सीने 2026 साली होणारा फिफा वर्ल्डकप खेळण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.
खरंतर मेस्सीने यापूर्वी सांगितले होते की 2022 साली कतारला झालेला फिफा वर्ल्डकप त्याचा अखेरचा वर्ल्डकप असणार आहे. पण आता त्याने हा निर्णय विचार करून घेणार असल्याचे स्पष्ट करत तो 2026 वर्ल्डकपही खेळू शकतो, पण याबरोबरच वयामुळे खेळणे कठीण असल्याचेही मान्य केले आहे.
त्याला अर्जेंटिनामधील वृत्तपत्र डिआरिओ ओलेने 2026 वर्ल्डकपमध्ये खेळण्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला, 'वयामुळे 2026 मध्ये खेळणे कठीण आहे. मला फुटबॉल खेळायला आवडते आणि मला जोपर्यंत असे वाटते की मी चांगल्या लयीत आहे आणि मजा घेत आहे, तोपर्यंत मी खेळत राहाणार आहे. पुढच्या वर्ल्डकपसाठी अद्याप बराच वेळ आहे. पण माझी उपलब्धता माझी कारकिर्द पुढे कशी जाते, त्यावर अवलंबून असेल.'
यापूर्वी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक लिओनेल स्कॅलोनी यांनीही स्पॅनिश रेडिओ कॅल्विया एफएमशी बोलताना सांंगितले होते की 'मला वाटते की मेस्सी पुढील वर्ल्डकपमध्ये खेळू शकतो. हे अनेक गोष्टींवर अवलंबून असेल, जसे की पुढे जाऊन त्याला काय वाटते, भविष्यात काय घडते, त्याचा चांगले वाटत आहे का. पण त्याच्यासाठी दरवाजे नेहमीच उघडे असतील. तो मैदानात आनंदी असतो आणि आमच्यासाठी ते चांगले आहे.'
मेस्सी 2026 च्या फिफा वर्ल्डकपपर्यंत 39 वर्षांचा होईल. त्याने आत्तापर्यंत 5 वर्ल्डकप खेळले असून 2022 मध्ये पाचवा वर्ल्डकप खेळताना त्याने विश्वविजेता होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. अर्जेंटिनाने त्याच्याच नेतृत्वाखाली 2022 फिफा वर्ल्डकप आपल्या नावावर केला होता.
फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 च्या फरकाने विजय मिळवत 36 वर्षांनी विश्वविजेतेपद जिंकले होते. मेस्सीने या वर्ल्डकपमध्ये 7 गोल केले आणि 3 असिस्टही नोंदवले होते.
त्यामुळे त्याने फिफा वर्ल्डकप 2022 मधील सर्वोत्तम खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कारही जिंकला. तो फुटबॉल वर्ल्डकपमध्ये दोनवेळा गोल्डन बॉल जिंकणारा पहिला खेळाडू आहे. त्याने 2014 वर्ल्डकपमध्येही गोल्डन बॉल जिंकला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत पाच वर्ल्डकपमध्ये आत्तापर्यंत 13 गोल नोंदवले आहेत.
दरम्यान, 2026 साली फिफा वर्ल्डकपचे आयोजन युनायटेड स्टेट्स, मेक्सिको आणि कॅनडा मिळून करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.