PSL 2023 Final: शनिवारी पाकिस्तान सुपर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना लाहोर कलंदर्स विरुद्ध मुलतान सुलतान संघात पार पडला. अखेरच्या चेंडूपर्यंत थरार रंगलेल्या या सामन्यात शाहिन शाह आफ्रिदी कर्णधार असलेल्या लाहोर कलंदर्सने 1 धावेने विजय मिळवत दुसऱ्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली.
या सामन्यात लाहोर कलंदर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 200 धावा केल्या होत्या. लाहोरकडून अब्दुल्लाह शफिकने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. तसेच शाहीन आफ्रिदीने फलंदाजीतही योगदान देताना 15 चेंडूत नाबाद 44 धावांची खेळी केली. मुलतान सुलतानकडून उसमा मीरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या मुलतान सुलतानला 20 षटकात 8 बाद 199 धावाच करता आल्या. त्यामुळे केवळ १ धावेने पराभवाचा सामना करावा लागला. मुलतान सुलतानकडून रिली रुसौने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली होती. लाहोरकडून कर्णधार शाहिनने सर्वाधिक 4 विकेट्सही घेतल्या.
मुलतान सुलतानला अखेरच्या षटकात 13 धावांची गरज होती. पण झामन खानने चांगली गोलंदाजी करताना 11 धावाच दिल्या. या षटकात अब्बास आफ्रिदी आणि खुशदील शाह फलंदाजी करत होते. या दोघांना पहिल्या चार चेंडूत पाच धावाच घेता आल्या होत्या.
पण पाचव्या चेंडूवर खुशदीलने चौकार ठोकत विजयाच्या आशा उंचावल्या. अखेरच्या चेंडूवर 4 धावा हव्या असताना मात्र खुशदीलला मोठा फटका मारता आला नाही. पण दोन धावा धावल्यानंतर तिसरी धाव घेताना तो धावबाद झाला. त्यामुळे लाहोरने हा सामना 1 धावेने जिंकला.
टी20 लीगमधील अंतिम सामन्यात केवळ 1 धावेने विजय मिळवणारा लाहोर कलंदर्स चौथा संघ ठरला आहे. यापूर्वी इंडियन प्रीमियर लीगमध्ये असा कारनामा मुंबई इंडियन्सने दोन वेळा केला आहे. मुंबई इंडियन्सने 2017 आणि 2019 साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात 1 धावेने विजय मिळवला होता.
तसेच बांगलादेश प्रीमियर लीग 2022 च्या अंतिम सामन्यात कॉमिल्ला विक्टोरियन्सने 1 धावेने विजय मिळवला होता. त्याचबरोबर इंग्लंडमधील टी20 ब्लास्टमध्ये 2022 मध्येच अंतिम सामन्यात हँम्पशायरने 1 धावेने विजय मिळवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.