Jasprit Bumrah Officially Ruled Out: भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे अधिकृतपणे T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराहची दक्षिण आफ्रिकेतील टी-20 मालिकेसाठीही निवड झाली होती, मात्र पहिल्या सामन्यात तो तंदुरुस्त नसल्यामुळे खेळू शकला नव्हता.
दरम्यान, बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी बोर्डाच्या वैद्यकीय टीमच्या हवाल्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'बुमराहला T20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे.' सविस्तर मूल्यमापन आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. BCCI लवकरच T20 विश्वचषकासाठी बुमराहच्या बदलीची घोषणा करणार आहे. 2022 च्या T20 विश्वचषकातून (T20 World Cup) बाहेर पडणारा बुमराह हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
यापूर्वी, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बुमराहच्या दुखापतीवर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी बुमराह टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. गांगुली म्हणाले होते की, 'विश्वचषकाला अजून बराच वेळ बाकी आहे.' परंतु आता वैद्यकीय पथकाने पुष्टी केली आहे. आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला बुमराहची सेवा मिळू शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, गांगुलीच्या आधी, पीटीआयने आपल्या वृत्तात सांगितले होते की, बुमराह दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे, जो पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी स्पर्धेपूर्वी संघासाठी मोठा धक्का असेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले होते की, 'बुमराह पाठदुखीच्या गंभीर समस्येने त्रस्त आहे आणि त्याला काही महिन्यांसाठी संघाबाहेर राहावे लागेल.'
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले होते की, बुमराह टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही हे निश्चित आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.