

Mumbai Indians New Captain IPL 2027: आयपीएल 2026 चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी अत्यंत निराशाजनक राहिला. स्पर्धेपूर्वी अत्यंत मजबूत दिसणारा हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल असा सर्वांचाच अंदाज होता; परंतु प्रत्यक्षात मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या खराब कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर प्रचंड टीका झाली आणि आता त्याला कर्णधारपदावरुन हटवण्याच्या हालचालींना वेग आला. ताज्या रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार कोण असावा, हे ठरवण्यात माजी कर्णधार रोहित शर्माची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) संघ व्यवस्थापन हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावरुन अजिबात खूश नाही. त्यामुळेच हार्दिकचा मुंबईचा कर्णधार म्हणून असलेला तीन वर्षांचा प्रवास आता संपण्याची दाट शक्यता आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, रोहित शर्माला अचानक कर्णधारपदावरुन हटवून हार्दिकला जबाबदारी देणे हा चुकीचा निर्णय होता, याची जाणीव आता व्यवस्थापनाला झाली.
भविष्यात संघात पुन्हा असे मतभेद किंवा वाद निर्माण होऊ नयेत, यासाठीच व्यवस्थापनाने नवीन कर्णधार निवडण्याची संपूर्ण प्रक्रिया रोहित शर्माच्या सल्ल्याने पूर्ण करण्याचे ठरवले. अर्थात, व्यवस्थापन रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याच्या विचारात नाही, तर संघाला एका नव्या आणि तरुण चेहऱ्याकडे घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे, ज्याला रोहितचा पूर्ण पाठिंबा असेल.
दुसरीकडे, कर्णधारपद गेल्यामुळे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) भूमिकेबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हार्दिक आगामी काळात केवळ एक खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्सकडून खेळू शकतो, असे वरवर दिसत असले तरी, सूत्रांनुसार तो स्वतःला दुसऱ्या संघात 'ट्रेड' करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे करु शकतो. हार्दिकने मुंबई सोडल्यास किंवा फक्त खेळाडू म्हणून खेळल्यास कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधारपदाच्या शर्यतीत सध्या जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांची नावे आघाडीवर आहेत. या दोघांकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आणि आयपीएलचा दांडगा अनुभव असून रोहित शर्मासोबत त्यांचे संबंधही अत्यंत सलोख्याचे आहेत. मात्र, संघ व्यवस्थापन जर भविष्याचा विचार करुन एखाद्या तरुण खेळाडूवर पैज लावण्याच्या विचारात असेल, तर युवा फलंदाज तिलक वर्मा हा देखील एक उत्तम आणि सक्षम पर्याय ठरु शकतो. एकूणच, आयपीएल 2027 च्या आधी मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठे फेरबदल पाहायला मिळणार असून, या नव्या पर्वाची धुरा रोहित शर्माच्या पसंतीच्या खेळाडूकडेच सोपवली जाईल हे आता स्पष्ट झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.