Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील पहिला सुपर संडे आज खेळवला जाणार असून दोन सामने होणार आहे. आज पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळवला जात आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून हॅरि ब्रुकने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. ब्रुक गेल्या अनेक महिन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो या आयपीएलमधून पदार्पण करेल असे अंदाज यापूर्वीच अनेकांनी वर्तवले होते.
तसेच या सामन्यात हैदराबादचे कर्णधारपद भुवनेश्वर कुमार सांभाळत आहे. हैदराबदचा नियमित कर्णधार ऐडेन मार्करम सध्या राष्ट्रीय संघाच्या वचनबद्धतेमुळे अद्याप भारतात आलेला नाही. त्यामुळे भुवनेश्वर प्रभारी कर्णधारपद सांभाळत आहे.
दरम्यान, या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादने फझलहक फारुकी, हॅरि ब्रुक, आदील राशिद आणि ग्लेन फिलिप्स या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तसेच मयंक अगरवालही या सामन्यातून सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पण करत आहे.
तसेच राजस्थान रॉयल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये जोस बटलर, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट आणि शिमरॉन हेटमायर या चार परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच राजस्थानसाठी या सामन्यातून होल्डर आणि केएम असिफ यांनी पदार्पण केले आहे.
त्याचबरोबर दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये चार परदेशी खेळाडूंना संधी दिलेली असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूंनाच वापरण्याची परवानगी असणार आहे.
असे आहेत प्लेइंग इलेव्हन -
सनरायझर्स हैदराबाद - मयंक अगरवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रुक, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), उमरान मलिक, टी नटराजन, फजलहक फारुकी
राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.