Mumbai Indians vs Chennai Super Kings: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज (8 एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत 12 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात खेळवला जाणार आहे. आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघ आणि त्याचबरोबर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन संघ ओळखले जातात.
पण, आता आयपीएल 2023 मधील एकमेकांविरुद्धच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा अनुभवी गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि चेन्नई सुपर किंग्सचा अनुभवी अष्टपैलू बेन स्टोक्स यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
माजी क्रिकेटपटू एस बद्रिनाथने त्याच्या युट्यूब चॅनेलवर माहिती दिली आहे की आर्चरच्या कोपराला सराव सत्रादरम्यान चेंडू लागला आहे. यापूर्वीही आर्चर कोपराच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स त्याला या सामन्यासाठी विश्रांती देऊ शकतात. असे झाल्यास रिली मेरिडिथ किंवा अर्जून तेंडुलकरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
याशिवाय स्टोक्सलाही सराव सत्रादरम्यान टाचेमध्ये वेदना जाणवल्या असल्याचे काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे. तसेच त्याला 10 दिवसांसाठी विश्रांती घेण्याचा सल्लाही देण्यात आल्याचे समजले आहे. आता त्याच्या दुखापतीवर सीएसकेची मेडिकल टीम अंतिम निर्णय घेणार आहे.
पण, सीएसके देखील स्पर्धेच्या सुरुवातीलाच दुखापतीसह स्टोक्सला खेळवण्याची जोखीम घेण्याची शक्यता कमी आहे. त्याचमुळे त्यालाही आजच्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. अशात सीएसकेचा संघ स्टोक्सच्या जागेवर सिसांडा मंगला किंवा ड्वेन प्रिटोरियसला खेळवू शकतात.
दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात होणारा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्सचा या हंगामातील दुसराच सामना आहे, तर सीएसकेचा तिसरा सामना आहे.
मुंबईने पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना केला आहे, तर सीएसकेने पहिला सामना पराभूत झाला आहे, तर दुसरा सामना जिंकला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून मुंबई विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल, तर सीएसके विजयी लय कायम राखण्याच्या हेतूने मैदानात उतरतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.