Chennai Super Kings vs Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना पार पडला. एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) झालेला हा सामना चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्सने जिंकला. हा चेन्नईचा 11 सामन्यांतील सहावा विजय ठरला आहे.
दरम्यान, चेपॉक स्टेडियमवर चेन्नईने 13 वर्षांनंतर मुंबई विरुद्ध विजय मिळवला आहे. यापूर्वी 2011 साली चेन्नईने या स्टेडियमवर मुंबईला पराभूत केले होते.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर 140 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग चेन्नईने 17.4 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला.
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवेने चांगली सुरुवात केली होती. एका बाजूने ऋतुराज आक्रमक खेळत होता, तर दुसरी बाजू कॉनवेने सांभाळली होती. मात्र चांगल्या सुरुवातीनंतर ऋतुराजला पीयुष चावलाने 5 व्या षटकात बाद केले. ऋतुराजने 16 चेंडूत 30 धावांची खेळी केली.
त्यानंतर रहाणेने कॉनवेला चांगली साथ दिली. मात्र रहाणेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर चावलाविरुद्धच 9 व्या षटकात 21 धावांवर पायचीत झाला. पण तोपर्यंत चेन्नईने 80 धावांचा टप्पा ओलांडलेला होता. नंतर अंबाती रायुडूही 12 धावा करून बाद झाला. पण नंतर कॉनवेने शिवम दुबेला साथीला घेत डाव पुढे नेला.
मात्र चेन्नईला विजयासाठी 10 धावांचीच गरज असताना कॉनवे 44 धावा करून बाद झाला. त्यामुळे एमएस धोनी फलंदाजीला आला. अखेर शिवम दुबे आणि धोनीने विजयी धावा पूर्ण केल्या धोनीने अखेरची विजयी धाव घेतली. दुबे 26 धावांवर आणि धोनी 2 धावांवर नाबाद राहिला.
मुंबईकडून पीयुष चावलाने 2 विकेट्स घेतल्या, तसेच ट्रिस्टन स्टब्स आणि आकाश मधवाल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पुर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. या सामन्यात मुंबईने सलामी जोडीमध्ये बदल केला. कर्णधार रोहित शर्माऐवजी कॅमेरॉन ग्रीन ईशान किशनसह सलामीला फलंदाजीसाठी उतरला. पण या दोघांनाही खास काही करता आले नाही. दुसऱ्या षटकात ग्रीनला 6 धावांवर तुषार देशपांडेने त्रिफळाचीत केले.
तसेच तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीपक चाहरने ईशान किशनला 7 धावांवर माघारी धाडले. दीपक चाहरने याच षटकात मुंबईला तिसरा धक्काही दिली. त्याने पाचव्या चेंडूवर रोहित शर्माला रविंद्र जडेजाकरवी झेलबाद केले. रोहित 3 चेंडूत शुन्यावर बाद होत माघारी परतला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संकटात सापडले होते.
पण नंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेराने डाव सांभाळला. त्यांची भागीदारी चांगली रंगत होती. मात्र 11 व्या षटकात सूर्यकुमारला 26 धावांवर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. नंतर स्टब्सने नेहलची साथ देण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर नेहलला 18 व्या षटकात मथिशा पाथिरानाने त्रिफळाची केले. नेहलने 51 चेंडूत 64 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 1 षटकार मारला.
त्याच्या पाठोपाठ टिम डव्हिड (2) आणि अर्शद खान (1) यांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्या. तर स्टब्सही 20 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईला 20 षटकात 8 बाद 139 धावाच करता आल्या.
चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने 4 षटकात केवळ 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच दीपक चाहर आणि तुषार देशपांडे यांनीही चांगली गोलंदाजी करताना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.