आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला राजस्थान रॉयल्सकडून 29 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आरसीबीच्या संघाची फलंदाजी फ्लॉप ठरली असून राजस्थानच्या जबरदस्त गोलंदाजीसमोर बंगळुरूच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहे. बंगळुरूच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. या सामन्यात बंगळुरूचा तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) गोल्डन डकचा शिकार झाला. ज्यामुळे त्याच्या नावावर एका वेगळ्याच विक्रमाची नोंद झाली आहे.
आयपीएलमध्ये (IPL) ग्लेन मॅक्सवेल सर्वात जास्त वेळा शून्यावर बाद होणारा विदेशी खेळाडू ठरला आहे. आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल आतापर्यंत 12 वेळा खाते न उघडताच माघारी परतला आहे. याबाबत त्याने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला मागे टाकले आहे. आयपीएलमध्ये रशीद आतापर्यंत 11 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
- आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे विदेशी खेळाडू
* ग्लेन मैक्सवेल- 12
* राशिद खान- 11
* सुनील नारायण- 10
* रियान परागच्या शानदार खेळीमुळं राजस्थाननं 144 धावा केल्या
या सामन्यात नाणे फेक गमावून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानने 8 विकेट्स गमावून 144 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने 31 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 56 धावांची खेळी केली. बंगळुरूकडून मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी दोन- दोन विकेट्स प्राप्त झाले.
राजस्थाननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव 19.3 षटकांत 115 धावांवर आटोपला. बंगळुरूकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 23, तर वानिंदू हसरंगानं 18 धावा केल्या. तसेच शाहबाज अहमदनं 17 धावांची खेळी केली. राजस्थानकडून कुलदीप सेननं 4, तर रविचंद्रन अश्विननं 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं 2 विकेट्स घेतल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.