Australian Open 2023: शेवटचं ग्रँडस्लॅम सानियासाठी लकी? बोपन्नासह 'फायनल'मध्ये धडक

सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Sania Mirza - Rohan Bopanna
Sania Mirza - Rohan BopannaDainik Gomantak

Sania Mirza - Rohan Bopanna: भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धेत भारताचा टेनिसपटू रोहन बोपन्नाबरोबर मिश्र दुहेरी प्रकारात खेळत आहे. या भारतीय जोडीने बुधवारी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

विशेष म्हणजे सानियासाठी ऑस्ट्रेलियन ओपन 2023 तिच्या कारकिर्दीतील अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे. त्यामुळे आता तिला तिच्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची संधी आहे.

Sania Mirza - Rohan Bopanna
Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाची मोठी घोषणा, 'माझ्या करिअरचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन...'

उपांत्य फेरीत मिळवला विजय

बुधवारी सानिया आणि रोहन यांनी उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित डिझायरे क्रावचेक अणि निल स्कुप्स्की या जोडीला एक तास 52 मिनिटे झालेल्या सामन्यात 7-6(5) 6-7(5) 10-6 अशा फरकाने पराभूत केले. या विजयाबरोबरच अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.

उपांत्य सामन्यात पहिल्या दोन सेटनंतर बरोबरी झाल्याने सुपर टायब्रेकर घेण्यात आला. या टायब्रेकरमध्ये सानिया आणि रोहन यांनी आघाडी मिळवली होती. त्यानंतर सानियानेच मॅच पाँइंट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यातील दोन्ही सेट रोमांचक झाले होते. दोन्ही जोड्यांकडून विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. पण अखेर भारतीय जोडीने या सामन्यावर पकड मिळवली.

आता सानिया आणि रोहन यांची जोडी शुक्रवारी अंतिम सामन्यात खेळेल.

सर्वांकडून खूप प्रेम मिळाले - सानिया

उपांत्य सामन्यानंतर सानिया म्हणाली, 'हा शानदार सामना होता. अनेक रोमांचक क्षण आले. ही माझी शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा आहे आणि रोहनबरोबर खेळणे खास आहे. मी जेव्हा 14 वर्षांची होते, तेव्हा माझा मिश्र दुहेरीतील पहिला जोडीदार रोहनच होता आणि आताही मी 36 वर्षांची आणि तो 42 वर्षांचा असतानाही तोच आहे. आम्ही अजूनही खेळत आहोत. आमच्यात चांगले सामंजस्य आहे.'

'मी रडणार नाहीय, मी त्याच्या जवळच आहे. मला 18 वर्षांपासून सर्वांकडून मिळणारे प्रेम जाणवते. इथे मला घरच्यासारखेच वाटते. माझे इथे कुटुंब असून मी घरचे जेवण जेवते आणि इथे अनेक भारतीय आहेत, जे मला पाठिंबा देतात.'

Sania Mirza - Rohan Bopanna
Sania Mirza: टेनिसपटू सानिया मिर्झाचा स्टायलिश लुक

तसेच रोहनने सांगितले की 'सानियाने सांगितल्याप्रमाणे आजचा सामना चांगल्या जोडीविरुद्ध होता. दुसरा सेट पराभूत झाल्यानंतर लय कायम राखणे सोपे नव्हते. पण आम्ही खंबीर राहिलो आणि आम्हाला सुरुवातीलाच आघाडी मिळाली, ज्यामुळे लय मिळवण्यासाठी सोपे गेले.'

त्याचबरोबर सानियाबरोबर खेळण्याबद्दल रोहनने सांगितले की 'तिच्याबरोबर कोर्टमध्ये खेळताना आनंद होत आहे. तिचा खूप शानदार प्रवास झाला आहे. तिने भारतात आणि आज इथेही अनेक चाहत्यांना प्रेरणा दिली आहे. अजून एक सामना आहे. तिने विजेतेपद जिंकावे हे स्वप्न आहे. यापेक्षा सुंदर शेवट असू शकत नाही. हे खूप खास असेल आणि भारतातही आम्हाला प्रेरणा देण्यासाठी याची गरज आहे.'

सानियाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की ऑस्ट्रेलियन ओपन 2023 स्पर्धा तिची अखेरची ग्रँडस्लॅम स्पर्धा असेल. तसेच ती कारकिर्दीतील तिची अखेरची स्पर्धा फेब्रुवारीमध्ये दुबईत खेळणार आहे.

Sania Mirza - Rohan Bopanna
Sania Mirza Shoaib Malik Divorce: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सानियाने शेअर केला फोटो

सानियाला सातव्या ग्रँडस्लॅमची संधी

सानियाने पहिल्यांदा 2005 साली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा खेळली होती. तिने आत्तापर्यंत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

तिने 2005 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिचे पदार्पण केले होते. तिने 2009 मध्ये मिश्र दुहेरीत महेश भूपतीसह ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2012 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. तिने 2014 साली ब्राझीलच्या ब्रुनो सोरेसबरोबर अमेरिकन ओपन विजेतेपद जिंकले होते.

त्याचबरोबर तिने महिला दुहेरीत 2016 साली ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकले होते. त्याआधी तिने 2015 साली विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेतही विजेतीपदे जिंकली होती. ही तिन्ही विजेतीपदे तिने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसबरोबर खेळताना जिंकली होती.

तसेच रोहन बोपन्नाने आत्तापर्यंत एकच ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहे. त्याने 2017 साली फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद जिंकले होते. त्याने कॅनडाच्या गॅब्रिएल डॅब्रोवस्कीबरोबर खेळताना हे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com