India vs New Zealand, T20I: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 27 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू होणार आहे. पण ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा युवा सलामीवीर ऋतुराज गावकवाडच्या या मालिकेतील उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या ऋतुराजने हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यानंतर उजव्या हाताच्या मनगटात वेदना होत असल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येही दाखल झाला आहे.
ऋतुराज न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठीही भारतीय संघाचा भाग आहे. पण आता त्याच्या मनगटाच्या दुखापतीतून लवकर सावरू शकला नाही, तर त्याला या मालिकेला मुकावे लागू शकते.
त्याने हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात मनगटात वेदना असतानाही फलंदाजी केली होती. पण त्याला त्या सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. तो 8 आणि शून्य धावा करून बाद झाला होता.
या सामन्यानंतर ऋतुराजने बीसीसीआयला त्याच्या दुखापतीबद्दल कळवले असून या दुखापतीचे मुल्यांकन करण्यासाठी एनसीएमधअये दाखल झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मनगटाच्या दुखापतीची तक्रार ऋतुराजने पहिल्यांदाच केलेली नाही. यापूर्वीही गेल्यावर्षी जुलैमध्ये त्याला मनगटाच्याच दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर व्हावे लागले होते.
आता, जर ऋतुराज न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेपर्यंत पूर्ण तंदुरुस्त झाला नाही, तर मुंबईचा लयीत असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
या टी20 मालिकेसाठी रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली भारतीय संघाचा भाग नाहीत. तसेच श्रेयस अय्यरही पाठीच्या दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत या मालिकेत हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.