MS Dhoni waving To Fans From House Terrace: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने शुक्रवारी (7 जुलै) त्याचा 42 वा वाढदिवस साजरा केला. त्याने त्याचा हा वाढदिवस त्याच्या रांचीतील घरी साजरा केला. त्याच्यावर वाढदिवसानिमित्त फक्त भारतभरातूनच नाही, तर जगभरातून सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान, त्यानेही काही चाहत्यांचा दिवस खास बनवला आहे.
धोनीच्या वाढदिवसानिमित्त भारतभरात विविध ठिकाणी त्याच्या चाहत्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले होते. याचदरम्यान काही चाहत्यांनी त्याच्या रांचीतील घराबाहेर गर्दी केली होती. याचदरम्यानचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की धोनी त्याच्या टेरेसवर काही लोकांसह उभा आहे. तेथून त्याने त्याच्या घराबाहेर असलेल्या चाहत्यांकडे पाहून हात हालवला. त्यामुळे त्याने त्याचा वाढदिवस चाहत्यांसाठीही खास बनवला.
धोनी हा केवळ भारतातीलच नाही, तर जगभरातील लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली, तरी त्याच्या लोकप्रियतेत घट झालेली नाही. दरम्यान, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये खेळणे सुरु ठेवले आहे.
धोनीने 23 डिसेंबर 2004 रोजी चितगावला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने 2007 मध्ये भारताच्या टी20 संघाचे आणि नंतर एकावर्षातच तो भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघाचा कर्णधार झाला. त्याने जवळपास 10 वर्षे भारतीय संघाचे नेतृत्व केले.
धोनीला भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 विजेतीपदं जिंकणाराही कर्णधार आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.