

India Archery Team Wins Gold Medal: आशियाई क्रीडा स्पर्धा 2026च्या 11व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत देशाची मान अभिमानाने उंचावली. विशेषतः तिरंदाजीच्या (आर्चरी) गेममध्ये भारतीय महिला संघाने चीनविरुद्ध ऐतिहासिक आणि रोमांचक विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महिलांच्या कंपाउंड आर्चरी फायनलमध्ये भारताच्या चिकिता तनिपार्थी, पृथिका प्रदीप आणि ज्योति सुरेखा वेन्नम या तिघींच्या त्रिकुटाने चिनी खेळाडूंना पराभवाचा दणका दिला. हा सामना अतिशय चुरशीचा झाला, ज्यामध्ये भारताने चीनला 238 विरुद्ध 234 अशा गुणांनी मात दिली आणि भारतासाठी हे या स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक ठरले. या विजयाचा प्रवास अतिशय रंजक राहिला.
फायनलमध्ये पोहोचण्यापूर्वी भारताच्या (India) या तिन्ही प्रतिभावान खेळाडूंनी उपांत्य फेरीत अत्यंत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला 234-233 अशा चुरशीच्या फरकाने पराभूत केले. त्यानंतर फायनलमध्ये चीनविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या दोन राऊंड्समध्ये भारताने सलग आघाडी घेत 60-57 अशी मजबूत पकड निर्माण केली. तिसऱ्या राऊंडमध्ये चिनी खेळाडूंनी जोरदार पुनरागमन करत सलग तीन वेळा 10 गुण मिळवण्याचे प्रयत्न केले, परंतु भारतीय संघाने ताळमेळ राखत 178-175 अशी आघाडी कायम ठेवली.
चौथ्या आणि अंतिम राऊंडमध्ये विजयासाठी भारताला केवळ आपली कामगिरी तशीच ठेवणे गरजेचे होते. चिनी खेळाडूंनी शेवटच्या निशाण्यांवर चांगली कामगिरी केली, मात्र टीम इंडियाने सलग सहा निशाणे थेट 10च्या अचूक मार्कवर लगावले. परिणामी, 238-234 असा रोमहर्षक विजय मिळवत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
या सुवर्ण कामगिरीसह भारतीय महिला संघाने 2014च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाने केलेल्या ऐतिहासिक विक्रमी स्कोअरची बरोबरी केली. दक्षिण कोरियाने त्यावेळी 240 पैकी 238 गुण मिळवले होते आणि त्यांचे फक्त दोनच शॉट चुकले होते. तब्बल 12 वर्षांनंतर भारताच्या या तिघींनी तीच कामगिरी पुन्हा करुन दाखवत देशाच्या युवा पिढीसमोर एक नवा आदर्श ठेवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.