

T20 World Cup 2026 Boycott Controversy: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्यावर पाकिस्तानने बहिष्काराचे अस्त्र उगारल्यामुळे क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचेच नुकसान होणार नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि जागतिक क्रिकेट अर्थव्यवस्थेलाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या एका सामन्याचे आर्थिक गणित इतके अवाढव्य आहे की, तो रद्द झाल्यास सुमारे 2200 कोटी रुपयांचा (250 मिलियन अमेरिकी डॉलर) फटका बसू शकतो. यामध्ये केवळ ब्रॉडकास्टर्सचे नुकसान नाही, तर तिकीट विक्री, जाहिराती आणि प्रायोजकत्व यांसारख्या अनेक घटकांचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये आयसीसी नेहमीच भारत आणि पाकिस्तानला (Pakistan) एकाच गटात ठेवते, कारण या एका सामन्यातून मिळणारा महसूल संपूर्ण स्पर्धेच्या यशासाठी महत्त्वाचा असतो.
जर पाकिस्तान आपल्या बहिष्काराच्या निर्णयावर ठाम राहिला, तर त्याचे सर्वाधिक गंभीर परिणाम पाकिस्तान क्रिकेटवरच होतील. आयसीसीला (ICC) पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) मोठा आर्थिक दंड आकारण्याचा अधिकार आहे. पीसीबीचे वार्षिक उत्पन्न साधारण 35.5 मिलियन डॉलर्स इतके आहे, तर या एका सामन्याची किंमत 250 मिलियन डॉलर्सच्या घरात आहे. याचा अर्थ असा की, या एका चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पूर्णपणे दिवाळखोरीत निघू शकते. माजी आयसीसी अधिकारी सामी-उल-हसन बर्नी यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानचे वार्षिक उत्पन्न आणि या सामन्यातून होणारे नुकसान यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हा निर्णय घेणे आर्थिकदृष्ट्या आत्मघातकी ठरु शकते.
दुसरीकडे, या सामन्याच्या ब्रॉडकास्टिंग अधिकारांचे मालक असलेल्या 'JioStar' सारख्या मीडिया कंपन्यांनाही मोठा आर्थिक फटका बसू शकतो. एका मोठ्या सामन्यासाठी जाहिरातींच्या माध्यमातून मिळणारे 200 ते 250 कोटी रुपये पाण्यात जाण्याची भीती आहे. या सामन्याच्या दरम्यान 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी सुमारे 40 लाख रुपये मोजले जातात, यावरुन या सामन्याची क्रेझ आणि त्यामागील पैसा लक्षात येतो. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तानने 'वॉकओवर' दिला तर भारताला गुण मिळतील, पण क्रिकेट चाहत्यांसाठी आणि आयोजकांसाठी तो मोठा तोटा असेल. सध्या पाकिस्तानचा संघ कोलंबोला पोहोचला असला तरी, ते मैदानात उतरतात की आपल्या निर्णयावर अडून राहून स्वतःला कंगाल करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.