India vs Australia, 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना बुधवारी (1 मार्च) सुरू झाला. या सामन्यात पहिल्याच दिवशी भारताची फलंदाजी कोलमडली. दरम्यान, पहिल्या डावात भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल जखमी झाला होता. पण त्याच्यावर सुनील गावसकरांनी टीका केली आहे.
झाले असे की प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माच्या रुपात सहाव्या षटकात पहिली विकेट गमावली होती. त्यामुळे त्याचा सलामी साथीदार शुभमन गिलवर डाव सावरण्याची जबाबदारी होती.
त्याने सातव्या षटकात जलद एकेरी धाव काढताना सूर मारला. त्यामुळे त्याला कंबरेच्या जवळ डाव्या बाजूला जखम झाली. टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमधून त्याला झालेली जखम स्पष्टपणे दिसत होती. त्याने लगेचच मेडिकल स्टाफलाही बोलावले. या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क गोलंदाजी करत होता.
दरम्यान, गिलने लगेचच मेडिकल स्टाफला बोलावणे गावसकरांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी याबद्दल समालोचनादरम्यान नाराजी व्यक्त केली.
गावसकर म्हणाले, 'मी सांगू का, गिल हे षटक संपेपर्यंच थांबू शकला असता. एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत आहे. त्याने चार चेंडू टाकले आहेत आणि बाहेर उष्णता आहे. या परिस्थितीत तुम्ही त्याला श्वास घेण्यासाठी वेळ देत आहात.'
'नक्कीच तुम्हाला जखम झाली आहे. पण तुम्ही नॉन-स्टायकर एन्डला आहात, तर आणखी दोन चेंडूंनंतर षटक संपायची वाट पाहा आणि मग उपचार घ्या. तुम्ही स्ट्रायकर एन्डलाही नाही आहात. काही गोष्टी फरक पाडू शकतात.'
गावसकरांच्या या प्रतिक्रियेवर त्यांच्याबरोबर समालोचन करणारा मॅथ्यू हेडन म्हणाला, 'सनी, तुम्ही खूप कठोर होत आहात. त्याला खरंच जखम झाली आहे.'
त्यावर गावसकर म्हणाले, 'हो नक्कीच त्याला जखम झाली आहे. पण तो देशासाठी खेळत आहे. आणखी दोन चेंडू बाकी होते फक्त आणि तो नॉन-स्ट्रायकर एन्डला होता. तो जर स्ट्रायकर एन्डला असता, तर मी समजू शकलो असतो की तुम्हाला सहजता जाणवत नाहीये.'
दरम्यान, गिलवर उपचार झाल्यानंतर स्टार्कने त्याचे षटक पूर्ण केले. तसेच गिल 8 व्या षटकात मॅथ्यू कुहनेमनच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथकडे झेल देत बाद झाला. गिलने 21 धावांची खेळी केली.
यानंतरही भारतीय फलंदाज मोठी खेळी करु शकले नाही. त्यामुळे भारताचा पहिला डाव 33.2 षटकात केवळ 109 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने 3 विकेट्स घेतल्या, तर टॉड मर्फीने 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.