IND vs AUS: अश्विनचा 'डुब्लिकेट'! कधी काळी विकायचा चहा, आता ऑसींना टीम इंडियाविरुद्ध करतोय मदत; Video

ऑस्ट्रेलिया सध्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जोरदार तयारी करत असून भारतीय गोलंदाजांचीच मदत घेत आहे.
Mahesh Pithiya
Mahesh PithiyaDainik Gomantak

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला असून त्यांचा जोरदार सरावही सुरू झाला आहे. त्यांनी ही तयारी करताना आर अश्विनसारखीच गोलंदाजी शैली असणाऱ्या गोलंदाजाला कॅप्ममध्ये सामील करून घेतले आहे.

ऑस्ट्रेलियाला या कसोटी मालिकेत सर्वाधिक धोका भारतीय फिरकी गोलंदाजांकडून असणार आहे. कारण भारतातील खेळपट्ट्या बहुदा फिरकी गोलंदाजीला मदत करतात. त्यातही अनुभवी फिरकीपटू आर अश्विनची ऑफ ब्रेक गोलंदाजी ऑसी फलंदाजांना घातक ठरू शकते.

Mahesh Pithiya
IND vs AUS: पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताची Playing 11 फिक्स! 'या' खेळाडूला मिळणार डच्चू

त्यामुळे त्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी बडोद्याचा 21 वर्षीय फिरकीपटू महेश पिठीया याला कर्नाटकमधील अलूरमध्ये बोलावले आहे. तिथे ऑस्ट्रेलियन संघाचा कॅम्प लागला असून तिथे ते भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहेत.

महेश हा मुळचा गुजरातमधील जुनागढमधील रहिवासी आहे. त्याची गोलंदाजी शैली अगदी आर अश्विनप्रमाणेच आहे. अश्विन त्याचा आदर्शही आहे. विशेष म्हणजे त्याची गोलंदाजी शैली ही नैसर्गिक आहे. त्याने वयाच्या 11 व्या वर्षापर्यंत अश्विनला खेळतानाही पाहिले नव्हते. त्याने 2013 साली पहिल्यांदा अश्विनला टीव्हीवर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका खेळताना पाहिले होते.

महेशचे वडील शेतमजूर म्हणून काम करत होते. त्याच्या घरातील अर्थिक परिस्थितीही फारशी बरी नव्हती. पण ही परिस्थिती कधीही महेशने त्याच्या कारकिर्दीच्या आड येऊ दिली नाही. तो एका काळी चहाच्या टपरीवरही काम करायचा. अखेर त्याच्या या मेहनतीचे फळ त्याला मिळाले असून तो ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आता सराव देत असल्याने त्याच्यावर सर्वांची नजर पडली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार महेशला पोरबंदर येथील एका कॅम्पदरम्यान एका स्थानिक प्रशिक्षकाने पाहिले आणि त्याला क्रिकेटमधील पुढील संधींसाठी बडोद्याला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार 2014 मध्ये महेश बडोद्यातील मोतीबाग क्रिकेट क्बलमध्ये सामील झाला. तिथे त्याला त्याच्या क्लबने बरीच मदत केली. तो त्यावेळी चहाच्या टपरीवर कामही करायचा.

तो म्हणाला, 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट प्रितेश जोशी यांनी माझा व्हिडिओ ऑस्ट्रेलियाला पाठवला होता, ज्यांनी मला निवडले. मी अश्विनप्रमाणे गोलंदाजी करतो. मी गेल्या दोन दिवसात सर्वाधिक गोलंदाजी स्टीव्ह स्मिथला केली आहे. तो मला म्हणाला की त्याला माझी गोलंदाजी शैली आवडली. मी अश्विन सरांच्या गोलंदाजीमधून काही ट्रिक्सही शिकल्या आहेत.'

Mahesh Pithiya
IND vs AUS: कसोटीतील 'हा' महारेकॉर्ड मोडण्याच्या उबंरठ्यावर अश्विन, द ग्रेट कुंबळेला मागे टाकून...

प्रीतेश जोशी हे देखील ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये थ्रोडाऊनचा सराव देत आहेत. त्यांनी महेश व्यतिरिक्त हैदराबादकडून खेळलेल्या मेहरोत्रा शशांकलाही ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये सामील करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो डावखरी फिरकीपटू आहे.

दरम्यान, महेशने गेल्याचवर्षी डिसेंबरमध्ये बडोद्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आत्तापर्यंत 4 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 8 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एका अर्धशतकासह 116 धावा केल्या आहेत. तो बडोद्याच्या 19 वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे. तसेच त्याची गेल्यावर्षी बीसीसीआयच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या कॅम्पमध्येही निवड झाली होती.

ऑस्ट्रेलियाची जोरदार तयारी

ऑस्ट्रेलियन संघ यंदा कोणताही सराव सामना न खेळता कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांनी सराव सामना खेळण्यापेक्षा मालिकेसाठी नेटमध्ये तयारी करण्यावर भर दिला आहे. त्याचमुळे त्यांनी भारतातील देशांतर्गत क्रिकेटमधील गोलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजीसाठी बोलावले आहे.

केएससीएच्या मैदानात ऑस्ट्रेलियन संघाचा चारदिवसीय कॅम्प सुरू आहे. या मैदानातील तीन खेळपट्ट्या कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने तयार केल्या आहेत. या तिन्ही खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजीला मदत करणाऱ्या आहेत.

ऑस्ट्रेलियन संघाला गेल्या तीन कसोटी मालिकेत भारताविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. विशेष म्हणजे गेल्या तीन कसोटी मालिकेतील दोन मालिका ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध त्यांच्याच मायदेशात गमावल्या आहेत. त्यामुळे यंदा पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन संघाला भारताविरुद्ध विजयाची अपेक्षा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com