India vs Australia ODI: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. आता या दोन संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेला 17 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यानंतर दुसरा सामना 19 मार्च रोजी विशाखापट्टणमला आणि तिसरा सामना 22 मार्चला चेन्नईला होणार आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत हे दोन्ही संघ अनेकदा वनडेत आमने सामने आले आहेत. त्यात कोण वरचढ ठरलेय यावर एक नजर टाकू.
भारत आणि ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंत एकमेकांविरुद्ध 143 वनडे सामने खेळले आहेत. यातील 53 सामने भारताने जिंकले आहेत, तर 80 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तसेच 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
त्याचबरोबर भारतात झालेल्या सामन्यांबद्दल आकडेवारी पाहिली, तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 64 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये 29 सामने भारताने आणि 30 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत 3077 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 2208 धावा केल्या आहेत, तर 2164 धावांसह रिकी पाँटिंग या यादीत तिसऱ्या आणि 2083 धावांसह विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर ब्रेट ली आहे. त्याने 55 विकेट्स भारताविरुद्ध वनडेत घेतले आहेत. सध्या दोन्ही संघात खेळत असलेल्या गोलंदाजांपैकी एकही जण या यादीत अव्वल 10 जणांमध्ये नाही.
सध्या सक्रिय खेळाडूंमध्ये या यादीत सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमीच्या नावावर आहेत. त्याने 29 विकेट्स घेतल्या असून त्याच्यापाठोपाठ 28 विकेट्ससह रविंद्र जडेजा आणि 27 विकेट्ससह ऍडम झम्पा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.