India vs Australia 1st ODI: भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. आता या दोन संघात शुक्रवारपासून (17 मार्च) तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु होणार आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्र राज्यात अनेक जिह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही ढगाळ वातावरण राहणार असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता या अवकाळी पावसाचा फटका वनडे सामन्याला देखील बसणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरम्यान रिपोर्ट्सनुसार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की शुक्रवारी मुंबईत पावसाची फारशी शक्यता नसली, तरी ढगाळ वातावरत असू शकेल. तसेच हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावरही पावसाचे सावट राहणार आहे.
हार्दिक पंड्या करणार नेतृत्व
मुंबईत होणाऱ्या वनडे सामन्यासाठी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा अनुपस्थित राहाणार आहे. त्याने कौटुंबिक कारणासाठी सुट्टी घेतली असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी हार्दिक पंड्या या सामन्यात भारताचे नेतृत्व करणार आहे.
तसेच रोहित 19 मार्चला होणाऱ्या दुसऱ्या सामन्यातून भारतीय संघात पुनरागमन करेल, तर 22 मार्चला या मालिकेचा अखेरचा सामना होईल.
ऑस्ट्रेलिया संघाचाही नियमित कर्णधार पॅट कमिन्स या वनडे मालिकेला मुकणार आहे. गेल्याच आठवड्यात त्याच्या आईचे कर्करोगाने निधन झाले असल्याने या कठीण काळात त्याने कुटुंबाबरोबर राहण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी या मालिकेत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना दिसेल.
आमने-सामने कामगिरी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आत्तापर्यंत 143 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये 53 सामन्यात भारताने आणि 80 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 10 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
तसेच भारतात या दोन संघात 64 सामने खेळवण्यात आले आहेत, यातील 29 सामने भारताने जिंकले आहेत, तर 30 सामने पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर 5 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.