IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला पुन्हा धक्का! कमिन्स इंदोर कसोटीतून बाहेर, 'हा' खेळाडू करणार 'कॅप्टन्सी'

भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स मुकणार आहे. तो दुसऱ्या कसोटीनंतर तातडीने मायदेशी परतला आहे.
Pat Cummins
Pat CumminsDainik Gomantak

India vs Australia: भारत दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला एकामागोमाग धक्के बसत आहेत. त्यांचे काही खेळाडू दुखापतीमुळे भारतीय संघाविरुद्ध पहिले दोन सामने खेळू शकले नव्हते. तसेच जोश हेजलवूडही आणि डेव्हिड वॉर्नरही उर्वरित कसोटी मालिकेत खेळणार नाही. अशातच आता कर्णधार पॅट कमिन्सही तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला असल्याचे समजले आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सध्या बॉर्डर-गावसकर ही 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना झाल्यानंतर पॅट कमिन्स कुटुंबातील सदस्य आजारी असल्याच्या कारणाने तातडीने मायदेशी परतला होता. आता तो तिसरा कसोटी सामन्यासाठी लगेचच परत येणार नसल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली आहे.

Pat Cummins
IND vs AUS: कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन

स्मिथ करणार नेतृत्व

कमिन्स इंदोरला 1 मार्चपासून होणारा तिसरा कसोटी सामना खेळणार नसल्याने आता उपकर्णधार स्टीव्ह स्मिथ या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाची नेतृत्वाची धूरा सांभाळताना दिसणार आहे. स्मिथला यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्याचा चांगला अनुभव आहे.

तो 2014 ते 2017 दरम्यान ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार होता. पण चेंडू छेडछाडी प्रकरणात त्याला त्याचे कर्णधारपद गमवावे लागले होते. त्यानंतर त्याला आता पुन्हा कसोटी संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे.

कमिन्सची आई आजारी

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार कमिन्सची आई आजारी आहे. त्याचमुळे कमिन्स सिडनीला परतला आहे. तसेच त्याने या काळात कुटुंबाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने सांगितले आहे की त्याच्या कुटुंबाबरोबर राहणे त्याच्यासाठी याक्षणी महत्त्वाचे आहे. तसेच त्याने या काळात त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि संघसहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

Pat Cummins
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन टीमची वनडे सिरीजसाठी घोषणा! भारताविरुद्ध तीन घातक खेळाडूंचे होणार कमबॅक

कमिन्स तिसऱ्या कसोटीत खेळणार नसला, तरी चौथ्या कसोटीसाठी पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात सामील होऊ शकतो. पण अद्याप चौथ्या सामन्यासाठी त्याच्या पुनरागमनाबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही.

दरम्यान, स्मिथ दुसऱ्या कसोटीनंतर चार दिवस पत्नी डॅनीबरोबर दुबईला फिरायला गेला होता. तो गुरुवारी संध्याकाळी पुन्हा दिल्लीत आला असून ऑस्ट्रेलियन संघात सामील झाला आहे. त्याला कमिन्सचा निर्णय कळवण्यात आला आहे.

हेजलवूड-वॉर्नरही बाहेर

दरम्यान, हेजलवूडला टाचेच्या वरच्या बाजूला दुखापत असल्याने तो भारताविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटीत खेळला नव्हता. आता तो या दुखापतीमुळे संपूर्ण भारत दौऱ्यातूनच बाहेर झाला आहे. तसेच डेव्हिड वॉर्नरच्या हातालाही दुसऱ्या कसोटीदरम्यान छोटे फ्रॅक्चर झाले असल्याने तो उर्वरित कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. हे दोघेही मायदेशी परतले आहेत.

पण, ऑस्ट्रेलियासाठी आनंदाची बातमी म्हणजे भारताविरुद्ध बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकलेले कॅमेरॉन ग्रीन आणि मिशेल स्टार्क तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पूर्ण तंदुरुस्त आहेत. त्यामुळे हे दोघेही तिसरी कसोटी खेळणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com