India vs England, 3rd Test Match at Rajkot:
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) खेळवला जाणार आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर सकाळी 9.30 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
दरम्यान सहा वर्षांनंतर राजकोटमध्ये कसोटी सामना भारतीय संघ खेळणार आहे. आत्तापर्यंत या मैदानात भारताने दोनच सामने खेळले आहेत. भारताने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर पहिला कसोटी सामना नोव्हेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
मोठ्या प्रमाणात धावा झालेला हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात जो रुट, मोईन अली, बेन स्टोक्स, ऍलिस्टर कूक, चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी शतके केली होती.
तसेच नंतर ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोटला दुसरा सामना खेळला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 272 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
याच सामन्यातून पृथ्वी शॉ याने पदार्पण केले होते. त्याने पदार्पणात शतकही झळकावले होते. या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली होती.
दरम्यान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक समजली जाते. तिसऱ्या कसोटीपूर्वी खेळबट्टीबद्दल बोलताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने म्हटले आहे की ही चांगली खेळपट्टी वाटत आहे.
तसेच लोकल बॉय रविंद्र जडेजाने म्हटले की 'प्रत्येक सामन्यात खेळपट्टी वेगळी असते. ही खेळपट्टी चांगली वाटत आहे. कधीकधी खेळपट्टी पाटा असते, तर कधी कधी त्यावर चेंडू फिरतो, तर कधी कधी पहिले दोन दिवसांनंतर त्यावर चेंडू फिरायला लागतो. मला वाटते की ती आधी चांगली खेळेल आणि नंतर भेगा पडती आणि चेंडू फिरायला लागेल.'
दरम्यान, मालिकेत सध्या पहिल्या दोन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे राजकोट कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेण्याची दोन्ही संघांना संधी असणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कच्या चॅनेलवर पाहाता येणार आहे. तसेच या सामन्याचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.